मुसळधार पावसामुळे राज्य बेहाल : वाहून गेले पूल, घरांचे नुकसान
वृत्तसंस्था/ गंगटोक
सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम सिक्कीम जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने 100 घरे जमीनदोस्त झाली आहेत. तसेच कित्येक पूल वाहून गेल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे कॉलेज खोला खोऱ्यावरील भागांमध्ये अचानक पूर आला, यामुळे सिम्फोक हा भाग सर्वाधिक प्रभावित झाला आहे. येथे पूरसंकटामुळे मोठा पूल वाहून गेला आहे.
ग्यालशिंग जिल्ह्यातील डेंटम येथे भूस्खलन झाल्याने शेकडो घरे अन् रस्त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच पीक अन् पशूधनाचीही हानी झाली आहे. लोअर सपुंगमध्ये कॉलेज खोला येथील पूल देखील भूस्खलनामुळे तुटला आहे. प्रशासनाकडून आपत्तीग्रस्त लोकांना तत्काळ मदत पुरविण्यात आली असून रस्ते अन् पूल दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्यात आले आहे.
16 जून रोजी लाचेन, लाचुंग आणि चुगथांग खोऱ्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे चुंगथांगमध्ये भूस्खलनाचा प्रकार घडला होता. यादरम्यान तेथे समुरो 2500 हून अधिक पर्यटक अडकून पडले होते. या पर्यटकांना बचावपथकाने सुखरुप बाहेर काढले आहे. रस्त्यांचे काम सुरू असलेल्या ठिकाणी कुणालाच जाण्याची अनुमती नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.