प्रियकराशी विवाह करण्यासाठी बांगलादेशातून पोहत भारतात
ऑनलाईन टीम/तरुण भारत :
वयाचे बंध नसावे, तसेच सीमेचे बंधन नसावे. प्रेम खरे असल्यास माणूस प्रसंगी सीमा देखील ओलांडतो. मग त्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबिला असो किंवा नसो. बांगलादेशातून एक अशीच चकित करणारे प्रेमकथा समोर आली आहे. तेथील एका महिलेने स्वतःच्या प्रियकराला भेटण्यासाठी उचललेले पाऊल जाणून घेतल्यावर तुम्ही चक्रावून जाल.
22 वर्षीय महिलेने भारतात राहणाऱया प्रियकराला भेटण्यासाठी अवैध मार्गाने सीमा ओलांडली, त्यासाठी तिने अत्यंत शूरपणे सुंदरबनमधील जंगलच नव्हे तर नदी देखील पार केली आहे. सुंदरबनच्या घनदाट जंगलात बंगाल टायगर तसेच मगरींचे मोठय़ा प्रमाणात वास्तव्य आहे.
फेसबुकवर झाली ओळख
या बांगलादेशी महिलेचे नाव कृष्णा मंडल असून भारतात राहणाऱया अभिक मंडलसोबत तिची फेसबुकवर मैत्री झाली. दोघांमधील संभाषण हळूहळू प्रेमात रुपांतरित झाले. कृष्णाकडे पासपोर्ट नव्हता, म्हणून तिने अवैध मार्गाने सीमा ओलांडून बांगलादेशातून भारतात येण्याचा धोकादायक मार्ग निवडला.
तासभर नदीत पोहत राहिली
सर्वप्रथम कृष्णाने सुंदरबन जंगलात प्रवेश केला, हे जंगल वाघांसाठी प्रख्यात आहे. त्यानंतर तिने नदीत सुमारे 1 तास पोहून भारतीय हद्दीत प्रवेश केला. तीन दिवसांपूर्वी कृष्णाने कोलकात्यातील कालीघाट मंदिरात अभिकसोबत विवाह केला आहे. परंतु सोमवारी तिला अवैध मार्गाने देशात प्रवेश केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कृष्णाला बांगलादेश दूतावासाकडे सोपविण्यात येणार आहे.
चॉकलेसाठी ओलांडली सीमा
तर चालू वर्षाच्या प्रारंभी एक बांगलादेशी किशोरवयीन (इमाम हुसैन) चॉकलेट खरेदी करण्यासाठी पोहून अवैध मार्गाने भारतात दाखल झाला होता. या मुलाला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या मुलाला बांगलादेशच्या अधिकाऱयांच्या हवाली करण्यात आल्याचे समजते.