महिलेच्या अपहरण प्रकरणात एसआयटीची कारवाई : न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला
प्रतिनिधी/ बेंगळूर
लैंगिक शोषण प्रकरणात पहिले आरोपी असणारे माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना महिलेच्या अपहरण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर एसआयटीच्या पथकाने रेवण्णा यांना माजी पंतप्रधान व निजद सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांच्या निवासस्थानातून अटक केली.
घरकाम करणाऱ्या महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर आहे. या महिलेले अपहरण करण्यात आल्याची तक्रार महिलेच्या मुलाने पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार म्हैसूरच्या के. आर. नगर पोलिसांनी शुक्रवारी एच. डी. रेवण्णा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणात अटकेची भीती असल्याने त्यांनी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी याचिका दाखल केली होती. शनिवारी सुनावणीवेळी एसआयटीने रेवण्णांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर आक्षेप दाखल केला. दरम्यान, रेवण्णा हे सायंकाळी 5:30 वाजता एसआयटीसमोर चौकशीला हजर होतील. तेव्हा त्यांना अटक केली जाऊ नये, असा अर्ज रेवण्णांचे वकील मूर्ती डी. नायक यांनी सादर केला. त्यानंतर न्यायाधीशांनी सुनावणी दुपारपर्यंत पुढे ढकलली.
दुपारी 2:45 वाजता पुन्हा सुनावणीला प्रारंभ झाला. रेवण्णांवर दुसऱ्या आरोपातही थेट आरोप नाही. दुसरा आरोपी सतीश बाबण्णा याच्यावर आरोप आहे. महिलेला सतीश यानेच नेले होते. रेवण्णा यांनी महिलेला नेल्याचा कोठेही उल्लेख नाही. त्याचप्रमाणे एफआयआरमध्ये महिलेच्या नावाचा उल्लेख नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. तर एसआयटीच्या वकिलांनी, महिलेला तक्रार दाखल न करण्यास दबाव आणण्यात आला आहे. आरोपी प्रभावी व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद केला. वाद-युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीश संतोष भट यांनी रेवण्णांची याचिका फेटाळून लावली.
त्यामुळे एच. डी. रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या बेंगळूरच्या पद्मनाभनगर येथील निवासस्थानी असल्याची माहिती मिळताच एसआयटीने त्यांना तेथून अटक केली.