राहुल गडकर,प्रतिनिधी
Kolhapur Political News : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मागे ईडीची ससेमारी लागल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाऊन भाजपच्या गोठ्यात सामील झाले.राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ होऊन भाजप शिवसेनाच्या सत्तेला राष्ट्रवादीची भक्कम साथ मिळाली.कोल्हापूर जिल्ह्यातील माजी मंत्री हसन मुश्रीफ देखील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.त्याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यात देखील होऊ लागला आहे.असे असताना कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार के. पी. पाटील देखील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत अशी खात्रीलायक माहिती तरुण भारतच्या हाती लागली आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय आज सूतगिरणीवरील कार्यकर्त्यांच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. एकूणच के. पी. पाटील हे अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा कल व्यक्त करण्यात येत आहे.
राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे बदल घडत असताना कोल्हापूरच्या राजकारणात देखील खळबळ उडाली आहे. माजी आमदार के. पी. पाटील हे देखील काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.रात्री उशिरा ते कोल्हापुरात दाखल झाले असून आज कार्यकर्त्यांसोबत सूतगिरणीवर महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.या बैठकीत ते कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार आहेत.त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा विचार ते बोलून दाखवण्याची शक्यता आहे.जर के.पी. पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले तर राधानगरी तालुक्यात देखील राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.