पुणे / प्रतिनिधी :
भाजपच्या चार महिला आमदारांची एका भामट्याने चक्क फोन करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. भाजपच्या आमदार आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे यांना भामट्याने फोन करून आई आजारी असल्याचे कारण देत त्यांच्याकडून गुगल पेद्वारे रक्कम घेतली. या प्रकरणी आरोपीवर बिबवेवाडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल आमदार माधूरी मिसाळ यांना एका दुरध्वनीवरून फोन आला. यावेळी त्या त्यांच्या कार्यालयात होत्या. संबंधित व्यक्तीने त्याची आई आजारी आहे. उपचारासाठी काही रक्कम लागणार असल्याचे सांगितले. दरम्यान, माधूरी मिसाळ यांना ते खरे वाटते. त्यांनी माणुसकीच्या नात्याने त्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर गुगल पेद्वारे 3400 रुपये ट्रान्सफर केले.
या भामट्याने आमदार श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे यांनाही अशा पद्धतीने फोन करून त्यांच्याकडूनही रक्कम घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, आमदारांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर माधूरी मिसाळ यांच्या मुलीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. या प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करत असून, आरोपीचा शोध सुरू आहे. एकाच वेळी चार आमदारांना फसवण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा : खासदार श्रीरंग बारणे शिंदे गटात सामील