वृत्तसंस्था/ पाँटेव्हेद्रा (स्पेन)
येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो फ्रिस्टाईल गटात भारताचा मल्ल अमनने अंतिम फेरीत प्रवेश मिळवून आपले किमान रौप्यपदक निश्चित केले आहे.
उपांत्यफेरीच्या लढतीत अमनने किर्गिस्तानचा मल्ल बेकझेथ युलूचा 10-5 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता सुवर्णपदकासाठी अमन आणि तुर्कीचा अहमत दुमेन यांच्यात लढत होईल. या स्पर्धेत पहिल्या फेरीच्या लढतीत अमनने लंकेच्या मधुशंका रॉड्रिगोचा पराभव करून पुढील फेरीत स्थान मिळविले होते. त्यानंतर त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जपानच्या ऍबेवर मात केली होती. या स्पर्धेमध्ये ग्रिको रोमन विभागात भारतीय मल्लांनी 3 पदके मिळवून नवा इतिहास घडविला आहे. या क्रीडा प्रकारात भारताच्या विकासने 72 किलो गटात, साजन बनवालाने 77 किलो गटात तर नितेशने 97 किलो गटात कांस्यपदके मिळविली. महिलांच्या 50 किलो वजनगटामध्ये भारताची मल्ल अंकुशने रौप्यपदक घेतले.