वृत्तसंस्था/ लंडन
यजमान इंग्लंड महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील सोमवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 109 धावानी दणदणीत पराभव केला. या सामन्यात शतक झळकवणारी इंग्लंडची फलंदाज टॅमी ब्युमाँटला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. वनडे क्रिकेटमध्ये ब्युमाँटने आपले नववे शतक झळकविले.
दिवस-रात्रीच्या या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 50 षटकात 7 बाद 371 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 45.4 षटकात 262 धावात आटोपला.
इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या टॅमी ब्युमाँटने 107 चेंडूत 1 षटकार आणि 19 चौकारासह 119, इमा लॅम्बने 66 चेंडूत 8 चौकारासह 65, सोफिया डंक्लेने 53 चेंडूत 6 चौकारासह 61, कर्णधार नाईटने 49 चेंडूत 9 चौकारासह 63, डॅनी वॅटने 14 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह जलद 33 धावा झोडपल्या. लॅम्ब आणि ब्युमाँट यांनी सलामीच्या गडय़ासाठी 149 धावांची भागीदारी केले. लॅम्ब बाद झाल्यानंतर ब्युमाँट आणि डंक्ले यांनी दुसऱया गडय़ासाठी 87 धावांची भर घातली. इंग्लंडच्या डावामध्ये 3 षटकार आणि 47 चौकार नेंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे खाकाने 64 धावात 2 तर इस्माईल डी. क्लर्क तसेच मॅलेबा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या डावात ट्रायोनने 57 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारासह 70, कॅपने 54 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारासह 62, उलवर्टने 51 चेंडूत 11 चौकारासह 56, गुडॉलने 24 आणि स्टेनने 12 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 4 षटकार आणि 30 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे चार्ली डिन आणि इमा लॅम्ब व ऍलीसी रिचर्डस् यांनी प्रत्यकी 3 तर वांगने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड 50 षटकात 7 बाद 371 (ब्युमाँट 119, लॅम्ब 65, डंक्ले 51, नाईट 63, वॅट 33, खाका 2-64, इस्माईल, डी. क्लर्क आणि मॅलेबा प्रत्येकी एक बळी), दक्षिण आफ्रिका 45.4 षटकात सर्व बाद 262 (ट्रेयॉन 70, कॅप 62, उलवर्ट 56, गुडॉल 24, स्टीन 12, डीन 3-42, लॅम्ब 3-42, ऍलीसी रिचर्डस् 3-35, वांग 1-50).