विरोधी पक्षनेते मायकल लोबोंची माहिती : पॅनलमध्ये जनतेशी संवाद, मदत करणारे उमेदवार
प्रतिनिधी /पणजी
‘टु गेदर फॉर कळंगूट’ या बॅनरखाली पाच वर्षांपूर्वी पॅनल निवडून आणले तेव्हापासून कळंगूटवासियांना दिलेली सर्व आश्वासने पूर्णत्वाकडे नेली. फुटसाल मैदान, पायवाटे 3 मीटर करणार, वीज सबस्टेशन, दोन ठिकाणी चिर्ल्डन पार्क व खोब्रावाडा येथे वयोवृद्धांसाठी पार्क, घरोघरी कचरा गोळा करणे आदी सर्व कामे सरकारच्या मदतीने कळंगूट पंचायतीने पूर्ण केल्याची माहिती विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी कळंगूट येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पॅनलचे अकराही उमेदवार पावलू थॉमस डिसोझा, चंद्रकांत (चानू) चोडणकर, अनुष्का केरकर, संगीता मोरजकर, मंजीत पार्सेकर, शॉन सिल्वेरिया, फ्रान्सिस रॉड्रिग्स, सुरज नाईक, ऍड. सोनिया दाभोळकर, दिनेश सीमेपुरुषकर, फिलोमिना फर्नांडिस उपस्थित होते.
जनतेशी संवाद, मदत करणारे उमेदवार
जनतेशी संवाद साधणारे, मदत करणारे उमेदवार आम्ही पॅनलमध्ये ठेवले आहेत. कोणालाही त्रास देणार नाही, नोटीस बजावणार नाही. भयभीत होऊन कळंगूट पुढे जाणार नाही. ज्यांनी गेस्ट हाऊस घातले, छोटा-मोठा व्यवसाय थाटला आहे त्यांनी घाबरण्याची गरज नाही, असे लोबो म्हणाले. तुम्ही आमच्या पॅनलला निवडून द्या, आम्ही तुम्हाला घरोघरी सेवा देण्यास बांधिल आहोत, असे लोबो यांनी सांगितले.
लोकांना विश्वासात घेऊन कळंगूटचा विकास : शॉन मार्टिन्स
सर्व ग्रामस्थांच्या मदतीनेच आणि पाठिंब्याने गेल्या पाच वर्षांपासून कळंगूटमध्ये विकासाची गंगा आणली. आता जी आश्वासने आम्ही देत आहोत ती सुद्धा पाच वर्षांच्या कालावधी एकत्रितपणे पूर्ण करणार. आम्ही कोणालाही धमकी दिली नाही उलट विश्वासात घेऊन समस्या सोडविल्याचे माजी सरपंच तथा पॅनलचे प्रमुख शॉन मार्टिन्स यांनी सांगितले.