कृष्णात चौगले, कोल्हापूर
गायरान अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाविरोधात 15 नोव्हेंबरला जिह्यातील हजारो अतिक्रमणधारकांनी महामोर्चा काढून अतिक्रमण नियमित करण्याची जोरदार मागणी केली होती.यावेळी अनेक नेत्यांनी भाषणे करून आम्ही अतिक्रमणधारकांच्या केसालाही धक्का पोहचू देणार नाही,अतिक्रमण हटविल्यास रक्तपात होईल, आम्ही न्यायालयात याचिका दाखल करू,अशी अनेक अभिवचने दिली होती.पण त्यांच्याकडून कृती मात्र शून्य झाली असून आजतागायत त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे.आमदार प्रकाश आवाडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे अतिक्रमण हटविण्यास स्थगिती मिळाली असली तरी त्याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे अतिक्रमणधारक अद्याप धास्तावलेलेच आहेत.याचिकेवर 23 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
गेल्या काही वर्षात वाढलेली लोकसंख्या आणि त्या तुलनेत राहण्यासाठी गावानजीक स्वमालकीची जमीन नसल्यामुळे ग्रामस्थांनी शासकीय जमिनीमध्ये घरे बांधली आहेत.पण करवीर तालुक्यातील हालसवडे गावामधील गायरान जमिनीच्या अतिक्रमणाच्या वादग्रस्त मुद्यावरुन राज्यातील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता.त्यानुसार प्रशासनाकडून कारवाई देखील सुरु झाली होती.त्यामुळे राज्य शासनाने तातडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्याबाबत स्थगिती घेण्याची अतिक्रमणधारकांनी मागणी केली होती.पण आजतागायत शासनाने अतिक्रमणाबाबत न्यायलायत कोणताही ठोस मुद्दा मांडलेला नाही. दोन महिन्यांपूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सदरची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले.त्यानुसार आवाडेंनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे.
रहिवासी अतिक्रमणे कायम होण्याची शक्यता
दाखल याचिकेनुसार न्यायालयाकडून राज्यात किती भूमीहिन नागरिकांनी गायरानमध्ये अतिक्रमण केले आहे ?अतिक्रमणधारकांपैकी किती जणांचे गावठाणमध्ये स्व मालकीच्या जागेत घर आहे ? शेती,व्यापार,उद्योगधंदे,स्वयंचलित संस्थांसाठी किती अतिक्रमणे झाली आहेत ?नियमित झालेली अतिक्रमणे किती आहेत ? आदी विविध बाबींचा अहवाल शासनाकडून घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या माहितीच्या आधारे न्यायालयाकडून पुढील निर्णय दिला जाऊ शकतो.यामध्ये अतिक्रमण काढण्यासाठी निकष ठरवून रहिवासी कारणांसाठी केलेली अतिक्रमणे कायम केली जातील असा अंदाज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.यामध्ये शेतीसह,व्यवसाय आणि उद्योगधंद्यासाठी केलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई होऊ शकते.
स्वयंघोषित वकीलांकडून बनवाबनवी
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिह्यातील गायरान जमिनीतील सव्वा लाखांहून अधिक अतिक्रमणे काढण्याचा निर्णय झाला.या निर्णयाला सध्या स्थगिती मिळाली असली तरी काही स्वयंघोषित वकीलांकडून अतिक्रमण कायम करून देतो ,पण त्यासाठी फी द्यावी लागेल असे सांगून अतिक्रमणधारकांकडून प्रत्येकी 2 हजारांपासून 10 हजार रुपयांची मागणी केली जात आहे.अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत आपले घर नाहीसे होणार या भितीने अनेक अतिक्रमणधारक अशा वकीलांच्या बनवाबनवीचे बळी ठरले आहेत.
अतिक्रमणधारकांनो अगतिक होऊ नका
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून कारवाई सुरु आहे.ही कारवाई रोखण्याचे अधिकार प्रशासन अथवा शासनाकडे नाहीत.न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच अतिक्रमण कायम होऊ शकते.त्यामुळे अतिक्रणधारकांनी अगतिक होऊन कोणताही स्थानिक नेता,संघटना अथवा चुकीच्या व्यक्तीकडे पैसे देऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.
2018 च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी हवी न्यायालयाची परवानगी
गायरान जागेत बांधलेली बहुतांशी घरे 2011 पूर्वीची आहेत. त्यामुळे ही घरे कायम करण्याबाबत 2018 मध्ये शासन निर्णय झाला होता. त्यानुसार जिह्यातील ग्रामपंचायतींनी शासनाकडे सर्व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले आहे. यामध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंतची घरे शासकीय मुल्य भरून कायम करण्याचे निश्चित झाले होते. पण गायरान जमिनीतील अतिक्रमणाबाबत न्यायालयीन वाद सुरु झाल्यामुळे हा शासन निर्णय मागे पडला. न्यायालयाने हाच फॉर्म्यूला कायम करण्याची परवानगी दिल्यास राज्यातील बहुतांशी अतिक्रमणधारकांना न्याय मिळणार आहे.
Previous Articleकोरगावकर व्याख्यानमालेत आज पत्रकार विजय चोरमारे
Next Article त्रिंबकच्या अवलिया कलाकाराने बनवला भलामोठा नगारा
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.