वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी यापुढे आपण राहणार नसल्याचे माजी कर्णधार सौरव गांगुलीने निर्णय घेतला आहे. तथापि आता आपण बंगाल क्रिकेट संघटनेच्या (सीएबी) अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचे ठरवले असल्याची माहिती गांगुलीने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
माजी कर्णधार सौरव गांगुलीने यापुर्वी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. दरम्यान त्याच्या अध्यक्षपदाची मुदत संपुष्टात आली आहे. आपण यापुढे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राहणार नसल्याचे स्पष्टीकरण त्याने दिले. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने 11 ऑक्टोबर रोजी सौरव गांगुलीला आयपीएल चेअरमनपदाची ऑफर दिली होती पण त्याने ही ऑफर नाकारली. आता तो बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहे.
बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली 22 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. सीएबीच्या पॅनेलशी चर्चा करूनच गांगुलीने हा निर्णय घेतला आहे. यापुर्वी सौरव गांगुलीने सीएबीचे अध्यक्षपद भूषविले होते. आता तो दुसऱयांदा हे पद भूषविण्यासाठी इच्छूक आहे. 18 ऑक्टोबर रोजी मुंबईत भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक होणार आहे. या बैठकीसाठी गांगुली मुंबईत दाखल होणार आहे. या बैठकीवेळी गांगुली आपल्या अध्यक्षपदाची सूत्रे मंडळाच्या नव्या अध्यक्षाकडे अधिकृतपणे सोपविणार आहे. 2015 ते 2019 या कालावधीत सौरव गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत होता. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या आगामी अध्यक्षपदासाठी माजी कसोटीवीर रॉजर बिन्नी आणि जय शहा यांच्यात चुरस अपेक्षित आहे.