वार्ताहर /उसगांव
गांजे-उसगांव येथील श्री गांजेश्वरी शांतादुर्गा देवीचा पहिला वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनिशी उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळय़ानिमित्त गांजे गावातील ज्येष्ठ नाटय़ व भजन कलाकारांचा व मंदिर बांधलेल्या कारागिरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उसगांवचे जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, सन्माननीय पाहुणे म्हणून नगरगावचे माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ हजारे, गुळेली पंचायतीचे माजी सरपंच विशांत नाबर, श्री गांजेश्वरी शांतादुर्गा देवस्थान समितीचे अध्यक्ष विजय गांवकर, नूतन मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष विराज गांवकर, ज्येष्ठ नागरिक अनंत गोपीनाथ गांवकर, सत्कारमूर्ती आत्माराम सोयरू गांवकर, लक्ष्मीकांत उत्तम गांवकर, मधुकर बाबनी गांवकर, चंद्रकांत शिवराम गांवकर, गजानन अनंत भर्तु, कारागिर अण्णा दुराई, नटराजन, कार्तिक व शिवरेसन व्यासपीठावर उपस्थित होते. सत्कारमूर्तींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह भेट देऊन मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रेमनाथ हजारे यांनी सांगितले की गांजे गावाची परंपरा महान आहे. देवीची कृपा या गावावर आहे. एकसंघ राहून कार्य केल्यास यश प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. विशांत नाबर यांनी सांगितले की गांजे हा समृद्ध गाव आहे. संस्कृती व परंपरा जोपासण्याचे पुण्य कार्य येथील लोकांनी केले आहे. सत्काराला उत्तर देताना आत्माराम गांवकर व मधुकर गांवकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच विक्रमी वेळेत नूतन मंदिराचे काम पूर्ण केल्याबद्दल देवस्थान समिती, बांधकाम समिती व कारागिरांचे कौतुक केले.
विजय गावकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न बर्वे यांनी केले तर अनंत गांवकर यांनी आभार मानले. सकाळी धार्मिक विधी, दुपारी आरत्या व महाप्रसाद, सायं. 7 वा. देवीची पालखी मिरवणूक व रात्री 10 वा. श्री गांजेश्वरी कला संघ प्रस्तुत ‘सं. वस्त्रहरण’ हा नाटय़प्रयोग सादर करण्यात आला.