डोंगरसोनीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; मान्यवरांकडून श्रद्धांजली
सावळज / वार्ताहर
तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावचे सुपुत्र शहीद जवान गणपती शंकर भोसले यांच्या पार्थिव देहावर रविवारी (दि.२९) डोंगरसोनी येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करून जवान भोसले यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी पुष्पचक्र वाहुन श्रद्धांजली अर्पण केली.
डोंगरसोनी येथील जवान गणपती भोसले हे भारतीय सैन्य दलात आसाममधील तेजपूर येथील १८१२ पायनियर युनिट मध्ये नाईक पदावर कार्यरत होते. ते ४२ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसापासून त्यांना यकृताच त्रास सुरु झाल्याने पुणे येथील सैन्य दलाच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची मुत्युशी झुंज अखेर उपयशी ठरली आणि शनिवारी २८ जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती.
रविवारी सकाळी अकरा वाजता जवान भोसले यांचे पार्थिव डोंगरसोनी येथे आणण्यात आले. पार्थिव दारात येताच कुटूबिंयांनी फोडलेला हंबरडा हा हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी ग्रामस्थांचे ही अश्रूंचे बांध फुटलेले दिसुन आले. यावेळी हार-फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली मधून गावातून अंत्ययात्रा काढुन गणपती भोसले यांचे पार्थिव ग्रामपंचायत समोर अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. ग्रामस्थांनी येथे या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत ‘अमर रहे..’ अशा घोषणा दिल्या.
यावेळी अंत्यसंस्कारापुर्वी आमदार सुमन पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील, ताजुद्दीन तांबोळी, तासगावचे नायब तहसीलदार नागेश गायकवाड, सावळज मंडल अधिकारी वसंत पाटील, सरपंच राणीताई झांबरे, उपसरपंच किशोर कोडग, ग्रामपंचायत सदस्य अमित झांबरे, चंद्रकांत मोहिते, राजाराम झांबरे, अभिजित झांबरे, ग्रामसेवक सुखदेव मोरे, तलाठी संदीप कांबळे यांच्यासह सैन्यातील अधिकारी, जवान यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. सैन्याच्या जवानांनी सलामी दिलेनंतर त्यांच्या मुलाने पार्थिवास भडाग्नी दिला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करून जवान भोसले यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
गणपती भोसले यांचा जीवनप्रवास
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भोसले यांनी आपले शिक्षण घेतले होते. दहावीपर्यंतचे शिक्षण डोंगरसोनी हायस्कूल मध्ये घेतले. नंतर ते भारतीय सैन्यदलात भरती झाले. ते एक चांगले चित्रकार होते. भरती होण्यापूर्वी गावात गणेश पेंटर नावाने परिचित होते. विविध पेंटिंगच्या माध्यमातून आपली कला जोपासली होती. गावात हनुमान मंदिरातील भिंतीवर त्यांनी साकारलेली श्री गणेशाचे, श्री. शंकराचे, श्रीराम आणि हनुमानाची तैलचित्रे आहेत. अत्यंत शांत, मनमिळावू स्वभावाच्या गणपती भोसले यांनी मोठा मित्र परिवार जोडला होता. त्यामुळे जवान भोसले यांच्या निधनाने डोंगरसोनीसह परीसरात शोककळा पसरली आहे.