जारी केलेली निविदा घेतली मागे
प्रतिनिधी /पणजी
गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे आखण्यात आलेला ‘टाकाऊतून टिकावू’ निर्मिती करणारा ‘कचरा कला पार्क’ प्रकल्प रद्द करण्यात आला असून त्यासाठी जारी करण्यात आलेली निविदा मागे घेण्यात आली आहे. निविदा तातडीने रद्द करण्यात येत असल्याची अधिसूचना महामंडळाने जारी केली आहे.
कांपाल-पणजी येथे असलेल्या भगवान महावीर बालोद्यानात सदर कचरा कला पार्क प्रकल्प साकार करण्याचा बेत महामंडळाने आखला होता. त्यासाठी रु. 8.92 कोटी खर्चाचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. परंतु, त्या प्रस्तावाला समर्थन मिळत नव्हते, तर विरोधच जास्त होत होता. कलाकार आणि पणजीतील नागरिकांनी कचरा पार्कसाठी कोटय़वधीचा खर्च करण्यास आक्षेप घेतला होता.
कचरा कला पार्कचा आराखडा, इंजिनियरिंग, विकास याकरीता महामंडाळाने निविदा प्रकाशित करून बोली प्रस्ताव मागवले होते. काही कंपन्यांनी त्यास प्रतिसाद देऊन निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यांनी काही रक्कम अनामत म्हणून महामंडळाकडे जमा केली होती. ती रक्कम संबंधित कंपन्यांना परत करण्यात येणार असल्याची माहिती अधिसूचनेतून देण्यात आली आहे. या कचरा कला पार्कवर विनाकारण कोटय़वधी खर्च होणार म्हणून टीकाही करण्यात आली होती. तो खर्च वाया जाऊन सदर प्रकल्प पांढरा हत्ती ठरणार असल्याची भीती व्यक्त झाली होती. एकंदरीत या प्रकल्पास समर्थन मिळत नसल्याने महामंडळाने तो रद्दच करून टाकल्याचे समोर आले आहे.
सरकारी निर्णयाचे स्वागत : आलेमाव
भाजप सरकारची माघारीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने ‘व्हेस्ट आर्ट पार्क’साठी काढलेल्या निविदा मागे घेण्याच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. सदर कामासाठी लागणारी 8.92 कोटींची रक्कम आता स्थानिक कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी खर्च करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
हे प्रकरण आपण 6 ऑक्टोबर 2022 रोजी उघड केले होते आणि ‘भ्रष्टाचाराचे स्मारक’ तयार करण्याची निविदा रद्द करावी अशी मागणी केली होती. सरकारच्या प्रत्येक प्रकल्पावर विशेषतः मिशन कमिशनच्या अजेंडय़ावर जे प्रकल्प केले जातात, त्याबाबत काँग्रेस पक्ष सतर्क राहील. आम्ही सरकारला वायफळ खर्च करू देणार नाही, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.