ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर (pune-mumbai expressway) गॅसचा टँकर पलटी होऊन झालेल्या विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर तीन ते चार जण जखमी असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळील तीव्र उतारावर आज सकाळी हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त गॅस टँकर पुण्याहून मुंबईकडे निघाला होता. टँकर खोपोली एक्झिटजवळ असताना टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला. त्यावेळी दोन कार एकापाठोपाठ एक टँकरला धडकल्या. या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तीन ते चार जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण हे सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच देवदूत आपत्कालीन पथक, आयआरबीचे कर्मचारी व खोपोली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. पोलिसांनी देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. सुदैवाने अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती झालेली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
महामार्गावरील दोन कार क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आल्या आहेत. खोपोली अग्निशमन विभागाच्या मदतीने टँकर महामार्गावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत खबरदारी म्हणून खोपोली अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पाण्याचा मारा करण्यासाठी सज्ज आहे.