ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अश्लील डान्सच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यकमात बीडमध्ये तुफान राडा झाला. बीडमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने गौतमीचा लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाल्याने चाहते अनियंत्रित झाले आणि त्यांनी स्टेजवर चढून राडा केला. या कार्यक्रामात दगडफेकीचाही प्रकार घडला.
बीडमधील राजुरी येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन लांडे यांनी गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला होता. गौतमीचा डान्स पाहायला हजारो चाहत्यांनी गर्दी केली. शेवटी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि अनियंत्रित चाहत्यांनी स्टेजवर चढून राडा घातला. स्टेजवर दगडफेकही करण्यात आली. काही तरुण झाडावर चढून हा कार्यक्रम पाहत होते.
अधिक वाचा : महाराष्ट्रात थंडी वाढणार
हा कार्यक्रम रस्त्याला लागूनच असल्याने बीड-परळी महामार्गावर जवळपास एक तास ट्राफिक जाम होते. त्यामुळे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे या कार्यक्रमाच्या रंगाचा अक्षरश: बेरंग झाला. अखेर आयोजकांना हा कार्यक्रम अर्ध्यावरच बंद करण्याची नामुष्की ओढवली. काही दिवसांपूर्वीच गौतमीच्या एका कार्यक्रमात शाळेचे छत तुटून एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ती वादात सापडली होती.