वृत्तसंस्था/ कीव्ह
जर्मनीचे राष्ट्रपती फ्रॅंक वाल्टर स्टीनमीयर हे युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी कीव्ह येथे पोहोचले आहेत. युक्रेन युद्धाला नऊ महिने होत आले असताना आणि रशियाकडून ‘डर्टी बॉम्ब’च्या हल्ल्याची धमकी देण्यात येत असताना त्यांनी हा दौरा केला आहे.
ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रs आणि रॉकेटच्या हल्ल्यांदरम्यान कीव्ह येथे मी येणे महत्त्वाचे आहे. हा दौरा युक्रेनसोबत आम्ही एकजूट असल्याचा संदेश देणारा असल्याचे राष्ट्रपती स्टीनमीयर यांनी कीव्ह येथे पोहोचल्यावर म्हटले आहे. जर्मनीचे राष्ट्रपती स्टीनमीयर हे एप्रिल महिन्यात पोलंड तसेच बाल्टिक देशांच्या प्रमुखांसोबत युक्रेनच्या दौऱयावर जाण्याच्या तयारीत होते. परंतु काही कारणांमुळे त्यांना तेव्हा हा दौरा करता आला नव्हता. मागील आठवडय़ात सुरक्षा कारणांमुळे त्यांनी स्वतःचा टाळला होता.