गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : पणजीत 53 व्या इफ्फीचे रंगारंग कार्यक्रमांद्वारे उद्घाटन; 28 पर्यंत चालणार महोत्सव : 79 देशांतील 280 चित्रपट
प्रतिनिधी /पणजी
चित्रपट निर्मितीशी संबंधितांना सर्व पायाभूत सुविधा तयार करून देण्याच्या दृष्टीने गोवा सरकार लवकरच सर्वसमावेशक धोरण राबविणार आहे. त्यासाठी चित्रपट निर्मात्यांनाही राज्यात गुंतवणूक करता येईल, अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.
पणजीत ताळगाव येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या शानदार उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. चित्रपट चित्रीकरणासाठी गोवा आदर्श ठिकाण असून येथे येणाऱयांना सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.
देश-विदेशातील दिग्गजांची उपस्थिती
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री एल. मुरुगन, राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्यासह अभिनेते अजय देवगण, सुनील शेट्टी, प्रभू देवा, परेश रावल, विजयेंद्र प्रसाद, तसेच फ्रान्स व स्पेन या देशांचे राजदूत, गोव्यातील सर्व मंत्री, आमदार, भाजप पदाधिकारी आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.
अजय देवगणसह अनेकांचा गौरव
अभिनेता मनोज वाजपेयी, सुनील शेट्टी, अजय देवगण, परेश रावल आणि आरआरआर व बाहुबली चित्रपटांचे कथाकार व्ही. विजयेंद्र प्रसाद यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल गौरविण्यात आले.
कार्लोस सॉरा यांना जीवनगौरव प्रदान
स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सॉरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांची कन्या ऍना सॉरा रामॉन हिने सदर पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी स्पेनहून व्हिडिओ कॉन्फरन्समधून बोलताना कार्लोस सॉरा यांनी इफ्फी आयोजकांचे आभार मानले.
कोविड काळातही भारताची सर्वोत्तम कामगिरी
कोविड काळ असतानाही क्रीडा आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत भारताने सर्वोत्तम कामगिरी केली, असे मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले.
गोव्याची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख
ओटीटीसारख्या नवीन प्लॅटफॉर्मचा स्वीकार करणे आणि त्यांना महोत्सवाचा सर्वसमावेशक भाग बनविणे हे आमचे ध्येय आहे, असे सांगून यापुढील इफ्फी अधिक दर्जेदार करण्यासाठी लोकांनी सूचना पाठवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. चित्रपट क्षेत्रात गोव्याने राष्ट्रीय आणि आंततरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली, असे ते म्हणाले.
79 देशांतील 280 चित्रपट
नऊ दिवसांच्या या महोत्सवात 79 देशांतील 280 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. ऑस्ट्रियन चित्रपट ’अल्मा आणि ऑस्कर’ने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ’परफेक्ट नंबर’ चित्रपटाने 28 नोव्हेंबर रोजी समारोप होणार आहे. यंदा फ्रान्स हा ’फोकस कंट्रीय’ देश असून ’कंट्री फोकस’अंतर्गत आठ चित्रपट दाखवले जाणार आहेत. ’इंडियन पॅनोरमा’मध्ये भारतातील 25 फीचर फिल्म्स आणि 19 नॉन फीचर फिल्म्स दाखवल्या जातील, तर 183 फिल्म्स आंतरराष्ट्रीय प्रोग्रामिंगचा भाग असतील.