वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई कनिष्ठांच्या टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंची कामगिरी समाधानकारक झाली असून या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी एकूण 4 पदकांची कमाई केली. भारताच्या पायस आणि यशस्वीनी या जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली.
या स्पर्धेत मुलांच्या 19 वर्षाखालील वयोगटातील दुहेरी तसेच मुलींच्या 19 वर्षाखालील वयोगटातील एकेरीत तसेच मुलांच्या सांघिक प्रकारामध्ये भारतीय स्पर्धकांनी एकूण तीन कास्यपदके मिळविली. मुलींच्या दुहेरीत भारताची टॉप सिडेड जोडी पायस आणि यशस्वीनी यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. या लढतीत भारताच्या या जोडीने 2-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर चीनच्या स्पर्धकांनी पुढील दोन गेम्स जिंकून बरोबरी साधली. पाचवा आणि निर्णायक भारतीय जोडीने जिंकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. मुलांच्या दुहेरीत भारताच्या स्पर्धकांना जपानच्या जोडीकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे भारताला या प्रकारात कांस्यपदक मिळाले.