अपघात लपविण्यासाठी मराठी भाषिकांनी दगडफेक केल्याची खोटी फिर्याद
प्रतिनिधी/ बेळगाव
हलग्याजवळ मराठी भाषिकांनी सरकारी वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्याचा आरोप बेंगळूर येथील एका वाहनचालकाने केला होता. या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून स्वत:वरील कारवाई टाळण्यासाठी मराठी भाषिकांना या प्रकरणात नाहक गोवण्याचा प्रयत्न झाला आहे.
बेंगळूर येथील चेतन एन. व्ही. (वय 55) या बोलेरो वाहनचालकाने हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात गुरुवारी फिर्याद दिली होती. केए 02 एमएम 5173 क्रमांकाचे अॅग्रीकल्चर रुरल डेव्हल्पमेंटचे वाहन अधिवेशनासाठी बेळगावला येताना बुधवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास सुवर्ण विधानसौधजवळ काही जणांनी अडविले.
वाहन अडविणारे मराठीतून बोलत होते. त्यांनी बोलेरोच्या काचा फोडून आपल्यालाही धमकाविल्याची फिर्याद चालकाने दिली होती. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त रविंद्र गडादी व इतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली असता वाहन चालकाचा खोटारडेपणा उघड झाला आहे.
गुरुवारी रात्री पोलीस आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे यासंबंधी माहिती दिली आहे. विधिमंडळ अधिवेशनासाठी हे सरकारी वाहन बुधवारी सकाळी 7.45 वाजता बेळगावला येण्यासाठी बेंगळुरातून सुटले. सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास शिग्गांव तालुक्यातील तडसजवळ एका बारमध्ये चालकाने दारू ढोसली. तेथून तो बेळगावच्या दिशेने निघाला.
धारवाडपासून हिरेबागेवाडी टोलनाक्या दरम्यान लोखंडी बार वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला बोलेरोची धडक बसली. त्यामुळे बोलेरोच्या डाव्या बाजुची काच फुटली. खरी गोष्ट सांगितली तर वरिष्ठ अधिकारी आपल्यावर कारवाई करणार या भीतीने वाहनचालकाने मराठी भाषिकांनी दडगफेक करून काचा फोडल्याची फिर्याद देऊन मराठी भाषिकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता.
वाहनचालकावर होणार कारवाई
पोलीस आयुक्तांनी एक सीसीटीव्हीचे फुटेजही जारी केले असून बुधवारी रात्री 7.28 वाजता हे बोलेरो हिरेबागेवाडी टोलनाक्यातून बाहेर पडले आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे सरकारी वाहनचालकाचा खोटारडेपणा उघडकीस आला असून कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडली असताना खोटी फिर्याद देणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली आहे.