प्रतिनिधी /डिचोली
गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी विठ्ठलापूर सांखळी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. या विठ्ठल मंदिराच्या संपूर्ण रचनेचा पाहणी करून राज्यपाल पिल्लई हे भारावून गेले. गोव्यातील ऐतिहासिक संचिते ही मानाला आकर्षण व समाधान देणारी असून येथील लोकही चांगल्या स्वभावाचे आहेत, असे गौरवोदगार राज्यपालांनी यावेळी काढले.
यावेळी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, पर्येच्या आमदार दिव्या राणे, विजयादेवी राणे, देवस्थान समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल पिल्लई यांनी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन आनंद व्यक्त केला.
गोव्यातील अनेक पुरातन मंदिरे व त्यांचा इतिहास खूपच प्रेरणादायी असून नेते नव्हे तर सामान्य जनता लोक हे सुप्रीम असल्याचे राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले. आपण इयत्ता नववीपासून विचारांच्या कक्षेत कार्यरत असून इतिहास व संस्कृती तसेच लोकांशी सतत जोडून राहण्याची आवड आहे. नेहमीच सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची आवड जोपासली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ग्रामीण भागातील लोकांशी संवाद साधण्यात येत असून उर्वरित भागात आपण दौरे करून लोकांशी हितगूज साधणार असल्याचे राज्यपाल म्हणाले. मंदिरात आरती करण्यात आली. विजयादेवी राणे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच प्रतापसिंह राणे यांनी मंदिराबाबत माहिती दिली. आमदार दिव्या राणे याही उपस्थित होत्या.