हजारो वारकरी-नागरिकांची उपस्थिती : तालुक्यातील अनेक गावच्या दिंडय़ा सहभागी
वार्ताहर /सांबरा
हजारो वारकरी व नागरिकांच्या उपस्थितीत तसेच टाळ मृदंगाच्या गजरात सोमवारी सांबरा येथे भव्य रिंगण सोहळा पार पडला. सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा प्रथमच पूर्व भागामध्ये रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती. दरवर्षी श्री विठ्ठल मंदिरासमोर सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते. पारायण सोहळ्यात काकड आरती, मंगल आरती, ज्ञानेश्वरी वाचन, गाथा भजन, महिला भजन, हरिपाठ, प्रवचन व कीर्तन निरूपण आदी कार्यक्रम सादर केले जातात. यंदा या पारायण सोहळ्याला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त येथे भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालखी पूजन गंगाण्णा कल्लूर यांनी केले. तर उभ्या रिंगण सोहळ्याचे उद्घाटन लँड डेव्हलपर्स शिवराज जाधव यांनी केले. मारुती गल्ली ते कलमेश्वर मंदिरपर्यंत उभा रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर गावातील एअरपोर्ट मैदानावर गोल रिंगण सोहळ्याचे उद्घाटन मृणाल हेब्बाळकर व ऍङ सुधीर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या रिंगण सोहळ्यातील माउलींचे अश्व पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. तर वारकरी मंडळींकडून टाळ मृदंगाच्या गजरात भजन सेवा करण्यात येत होती. या रिंगण सोहळ्यामुळे गावात अवघी पंढरी अवतरल्याचा भास होत होता. य् ाा रिंगण सोहळ्यासाठी मुचंडी, अष्टे, कलखांब, निलजी, चंदगड, खनगाव, कणबर्गी, बसरीकट्टी, शिंदोळी, मास्तमर्डी, हलगा, कल्लेहोळ, बेकिनकेरे, सुळगा (हिंडलगा), सावगाव, मंडोळी, सोनोली, कडोली, आंबेवाडी, कंग्राळी गौंडवाड, काकती, होनगा, बेळगुंदी, महिपाळगड, देवरवाडी, कोनेवाडी, अलतगा, बाळेकुंद्री खुर्द, मोदगा, सुळेभावी, माविनकट्टी, मुतगे, बसवण कुडची, हिंडलगा, तुरमुरी, तारीहाळ आदि गावातील दिंडय़ा सहभागी झाल्या होत्या. डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी लक्षणीय गर्दी केली होती. रिंगण सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी सुमारे दहा हजारहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रिंगण सोहळा यशस्वी करण्यासाठी वारकरी भजनी मंडळ, गावातील सर्व युवक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.