बेंगळूरची तेलगू टायटन्स तर युपीची जयपूरवर मात
वृत्तसंस्था/ बेंगळूर
नवव्या प्रो कबड्डी लीग हंगामात बेंगळूर बुल्स आणि युपी योद्धाज या संघांनी विजयी सलामी दिली. बेंगळूर बुल्सने तेलगू टायटन्सचा तर युपी योद्धाजने जयपूर पिंक पँथर्सचा पराभव केला.
येथील श्री कंठीरवा इनडोअर स्टेडियमवर ही स्पर्धा खेळविली जात आहे. शुक्रवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यात बेंगळूर बुल्स संघाने तेलगू टायटन्स संघाचा 34-29 अशा गुणांनी पराभव केला तर दुसऱया एका सामन्यात उत्तर प्रदेश राज्याचे प्रतिनिधीत्व करणाऱया युपी योद्धाज संघाने जयपूर पिंक पँथर्सवर 34-32 अशा केवळ दोन गुणांच्या फरकाने थरारक विजय नोंदविला.
बेंगळूर बुल्स आणि तेलगू टायटन्स यांच्यातील सामन्यात बेंगळूर बुल्स संघातर्फे नीरज नरवालने 7 गुण तर विकास कांडोला आणि भरत यांनी प्रत्येकी 5 गुण नोंदविले. या विजयामुळे बेंगळूर बुल्सने या स्पर्धेत आपली विजयी सलामी देत मार्गक्रमण केले. सामन्याच्या पूर्वार्धात तेलगू टायटन्सने बेंगळूर बुल्सवर मध्यंतरापर्यंत वर्चस्व राखले होते. पण, मध्यंतराला काही मिनिटे बाकी असताना बेंगळुर बुल्सच्या नीरज नलवान आणि भरत यांनी आपल्या चढायावर तेलगू टायटन्सचे गडी बाद करत 5 गुणांची आघाडी मिळवून दिली. मध्यंतरावेळी दोन्ही संघ 17-17 असे बरोबरीत होते.
सामन्याच्या उत्तरार्धात पहिल्या पाच मिनिटांच्या कालावधीत तेलगू टायटन्सने बेंगळूर बुल्सवर अल्पशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धातील नऊ मिनिटांच्या कालावधीत पुन्हा दोन्ही संघ 23-23 असे बरोबरीत राहिले होते. तेलगू टायटन्सतर्फे विशालने आपल्या दोन चडायावर चांगले गुण वसूल केले. पण बेंगळूर बुल्सच्या बचावफळीची कामगिरी भक्कम झाल्याने त्यांनी तेलगू टायटन्सवर 30-25 अशा पाच गुणांची आघाडी मिळविली होती. शेवटच्या पाच मिनिटांच्या कालावधीत बेंगळूर बुल्सने आणखी चार गुण मिळविले तर तेलगू टायटन्सने चार गुणांची कमाई केली. अखेर बेंगळूर बुल्सने हा सामना पाच गुणांच्या फरकाने जिंकला. बेंगळूर बुल्सतर्फे 12 टॅकल गुण तर तेलगू टायटन्स 7 टॅकल गुण मिळविले.
या स्पर्धेतील दुसऱया एका चुरशीच्या सामन्यात युपी योद्धाज संघाने जयपूर पिंक पँथर्सने 34-32 अशा दोन गुणांच्या फरकाने निसटता विजय नोंदविला. सामन्यातील शेवटच्या काही सेकंदामध्ये युपी योद्धाजच्या खेळाडूंनी हे महत्त्वाचे दोन गुण मिळविले. स्पर्धेच्या गुणतत्क्यात युपी योद्धाज संघ पाच गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. युपी योद्धाजचा पुढील सामना 10 ऑक्टोबरला यु मुंबा संघाबरोबर होणार आहे.
शुक्रवारच्या सामन्यात युपी योद्धाज संघातील सुरिंदर गिलने एक टॅकल गुणासह 9 गुण तर प्रदीप नरवालने 7 गुण मिळविले. या सामन्यात प्रदीप नरवालला विव्हो परिपूर्ण सामनावीर पुरस्कार मिळविला. युपी योद्धाज संघातील रोही तोमरने तीन गुण मिळविले. कर्णधार नितेशकुमार व सुमीत यांनी या सामन्यात प्रत्येकी दोन टॅकल गुण मिळविले. सामन्याच्या पूर्वार्धात जयपूर पिंक पँथर्सच्या बचावफळीतील खेळाडूंनी योद्धासच्या अव्वल कबड्डीपटूंना मात करत आपल्या संघाला 12-7 अशा गुणांची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर युपी योद्धाजने जयपूर पिंक पँथर्सची ही आघाडी मध्यंतरापर्यंत बरीच कमी केली. मध्यंतरावेळी जयपूर संघाने युपी योद्धासवर 15-12 अशा तीन गुणांनी बढत मिळविली होती. उत्तरार्धात दोन्ही संघामध्ये शेवटपर्यंत आघाडी राखण्यासाठी चुरस झाली. पण शेवटी युपी योद्धाजने जयपूर पिंक पँथर्सचा केवळ दोन गुणांच्या फरकाने पराभव करत या स्पर्धेत विजयी सलामी दिली.