बिहार राज्याची राजधानी पाटणा येथील रेल्वे जंक्शन स्थानकाचा फलाट क्रमांक 10 सध्या एका हमालाच्या चर्चेमुळे प्रसिद्धीस पावलेला आहे. या हमालाचे नाव आहे, त्याचे आव आहे धर्मनाथ यादव. या हमालाला नेहमी दोन पोलिसांचे संरक्षण असते. कित्येक वर्षांपासून तो या फलाटावर हमाली करतो. त्याला देण्यात आलेले पोलीस संरक्षण आणि हा हमालही चर्चेचा विषय बनला आहे.
एका हमालाला मिळालेले हे पोलीस संरक्षण पाहून लोक आश्चर्यचकित होतात. या हमालाची ख्याती पाकिस्तानपर्यंत पोहचलेली आहे. इतकेच नव्हे, तर पाकिस्तान या ‘हमाला’ला घाबरतो. पाकिस्तानकडून त्याला तब्बल 50 लाख डॉलर्सची ऑफर आल्याचे सांगितले जाते. पण धर्मनाथ यादव यांनी बाणेदारपणे ही ऑफर नाकारली आहे. एका हमालाला इतके महत्व का, हा प्रश्न कोणाच्याही मनात येणारच.
त्याचे उत्तर असे की हे सर्वसामान्य हमाल नाहीत. ते अत्यंत पराक्रमी आहेत. 27 ऑक्टोबर 2013 या दिवशी या स्थानकाच्या एका शौचालयात एक मोठा बाँबस्फोट झाला होता. तो इम्तियाझ नामक दहशतवाद्याने घडविला होता. त्यावेळी धर्मनाथ यादव त्याच फलाटावर हमाली करीत होते. त्यांनी क्षणाचही विलंब न लावता बाँबस्फोटामुळे झालेल्या धुरात पाठलाग करुन इम्तियाझ याला पकडले होते. हा दहशतवादी पाकिस्तानी होता. तो जिवंत हाती लागल्याने पाटण्यातील गांधी मैदान आणि याच राज्यातील बुद्धगया येथील दहशतवादी हल्ल्यांचा शोध लागला. इम्तियाझ पकडला गेला नसता तर महावीर मंदीरही उडविण्यात आले असते. पाटणा स्थानकावरील बाँबस्फोटाचे धर्मनाथ यादव हे एकमेव साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांना पाकिस्तानने 50 लाख डॉलर्स देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी तो हाणून पाडल्याने त्यांना पाकिस्तानकडून जीवे मारण्याच्या धमक्याही येतात. म्हणून त्यांना 2016 पासून संरक्षण देण्यात आले आहे. ते 1989 पासून हमालीचा व्यवसाय करतात. आज लक्षावधी लोक त्यांना ओळखतात आणि स्थानकावर त्यांच्यासह सेल्फी घेण्याची लोकांची स्पर्धा लागलेली असते. त्यांना पोलीस संरक्षण द्यावा असा आदेश न्यायालयानेही दिलेला आहे.