2 कोटीचे यंत्र ठरले निष्क्रीय
युक्रेनच्या कब्जातील भागांमध्ये रशियाच्या सैन्याने लूट चालविली आहे. काही दिवसांपूर्वी रशियाच्या सैनिकांनी मेलिटोपोल शहरातील एका विक्रेत्याकडून अनेक कृषी उपकरणे चोरून नेली होती. रशियाचे सैनिक ही उपकरणे घेऊन चेचन्यात पोहोचले. परंतु सुमारे 1100 किमीपेक्षा अधिक प्रवास केल्यावर त्यांना या उपकरणांचा वापर करता येणार नसल्याचे कळून चुकले. या उपकरणांना वितरकाने इलेक्ट्रॉनिकली लॉक करून टाकले होते.
काही आठवडय़ांपूर्वी रशियाच्या सैनिकांनी कृषी उपकरणे, धान्य आणि बांधकाम साहित्याची चोरी केली होती. परंतु मेलिटोपोलमध्ये जॉन डीरे डिलरशिपकडून महागडी आणि मोठय़ा कृषी उपकरणांची चोरी रशियाच्या सैनिकांना लाभदायक ठरलेली नाही. रशियाचे सैनिक आता रणगाडय़ांचा वापर चोरी केलेली सामग्री ठेवण्यासाठी करत आहेत.
आतापर्यंत चोरण्यात आलेल्या उपकरणांची एकूण किंमत 37.50 कोटी रुपये आहे. एका कंबाइन हार्वेस्टरची किंमतच 2 कोटी रुपयांहून अधिक आहे. दोन कंबाइन हार्वेस्टर, एक ट्रक्टर आणि एका सिडरच्या चोरीपासून हे सत्र सुरू झाले होते. पुढील काही दिवसांमध्ये एकूण 27 उपकरणांची चोरी झाली. चोरीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रकवर पांढऱया रंगाने ‘झेड’ असे लिहिलेले असल्याचे सीटीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. झेड असे रशियाच्या सैन्यावर वाहनांवर लिहिलेले असते.
चेचेन्यात पोहोचताच लॉक
काही उपकरणांना गावांमध्ये नेण्यात आले. तर काही 1100 किलोमीटरचा लांब प्रवास करून चेचेन्यामध्ये पोहोचली. ही उपकरणे जीपीएसने युक्त होते, त्यांना कुठूनही ट्रक करता येऊ शकत होते, यात अखेरचे लोकेशन चेचेन्या असल्याचे आढळून आले. चेचेन्या येथे पोहोचलेली कंबाइन हार्वेस्टर सारखी मोठी आणि आधुनिक कृषी उपकरणे दूर अंतरावरूनही नियंत्रित करता येऊ शकतात. हार्वेस्टरला युक्रेनमधूनच लॉक करण्यात आले होते.
सुटे भाग विक्रीचा होणार नाही लाभ
ही उपकरणे आता ग्रोज्नीच्या एका शेतीत निरुपयोगी स्थितीत उभी आहेत. याच्या सुरक्षाकवचाला तोडता येईल अशा तंत्रज्ञाचा शोध सैनिक घेत आहेत. जर याच्या सुटय़ा भागांची विक्री बाजारात केली तरी त्यांची किंमत अत्यंत कमी मिळणार आहे. रशियाच्या सैनिकांनी कब्जातील भागांमध्ये शेतकऱयांना पिकापासून मिळणाऱया लाभात 50 टक्के हिस्सेदारीची ऑफर दिली आहे.