प्रतिनिधी/ बेळगाव
येळ्ळूरच्या मारहाण खटल्यांची सुनावणी येथील जेएमएफसी द्वितीय न्यायालयामध्ये सुरू आहे. एका खटल्याचा निकाल लागला असून सोमवारी आणखी तीन खटल्यांची सुनावणी आहे. या खटल्यांमधील सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
येळ्ळूरच्या वेशीतील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या जनतेला अमानुष्यपणे मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर येळ्ळूरच्या जनतेवरच खटले दाखल करण्यात आले होते. या खटल्यांची सुनावणी गेल्या 9 वर्षांपासून सुरू आहे. जाणूनबुजून नाहक त्रास देण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. सोमवारी खटला क्रमांक 306, 166, 122 या तीन खटल्यांची सुनावणी होणार आहे.
यापूर्वी एका खटल्याचा निकाल लागला असून त्यामध्ये दहा जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. आता न्यायालयात सर्व जण उपस्थित राहिल्यास या सर्व खटल्यांचा निकाल लवकरात लवकर लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. शाम पाटील, अॅड. हेमराज बेंचन्नावर यांनी कळविले आहे.