मेघ गर्जनांसह पावसाच्या हलक्या सरी : झाडांची पडझड : वीज पुरवठा खंडित
प्रतिनिधी / फोंडा
गुरुवारी सायंकाळी सोसाटय़ाच्या वादळीवाऱयासह आलेल्या अवकाळी पावसामुळे फोंडा तालुक्यातील विविध भागांमध्ये झाडांची पडझड झाली. एकदोन ठिकाणी घरांवर तर बऱयाचठिकाणी रस्ता व वीज वाहिन्यांवर झाडे कोसळली. फोंडा अग्नीशामक दलात पडझडीच्या 18 ते 20 घटना नोंद झाल्या होत्या. अग्नीशामक दलाचे जवान व वीज कर्मचारी रात्री उशिरापर्यंत मदतकार्यात गुंतले होते.
रामनवमीच्या रात्री रविवार 10 रोजी अशाच प्रकारे फोंडा तालुक्यातील काही भागांना वादळीवाऱयाचा तडाखा बसला होता. त्यात प्रामुख्याने शिरोडा, बोरी व बेतोडा भागात मोठय़ाप्रमाणात पडझड होऊन काही घरांचेही नुकसान झाले होते. धारबांदोडा तालुक्यातही काही प्रमाणात झाडांची पडझड झाली होती. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान व उष्माचा पारा चढल्याने उकाडय़ाची धार तिव्र झाली होती. आभाळात काळे मेघ दाटून आल्याने सायंकाळपर्यंत पाऊस पडण्याची चिन्हे दिसत होती. सायंकाळी 6.30 वा. सुमारास अचनाक सोसाटय़ाचा वारा सुटला व मेघ गर्जनांसह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हा पाऊस साधारण अर्धा तास बरसला तरी, तप्त वातावरण किंचित शांत होऊन हवामानात थोडासा गारवा पसरला.
रस्ते, वीज वाहिन्या व घरांवर कोसळली झाडे
वादळी वाऱयाच्या तडाख्यामुळे फोंडा शहरासह, ओपा, खांडेपार, वाघुर्मे, सावईवेरे, उसगाव, कवळे आदी भागात झाडांची पझडझ झाली. काही ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला. पाऊणवाडा-कवळे येथे गेल्या दिवसांत दुसऱयांदा रस्त्यावर झाड कोसळले. वीज वाहिन्याही तुटल्याने कवळे, वाडी-तळावली व आसपासच्या भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. तालुक्यातील इतर काही भागांमध्येही विजेचा लंपडाव सुरु होता.
खडपाबांध-फोंडा येथे एका घरावर माड तर पंचमे खांडेपार येथे फणसाचे झाड कोसळले. तसेच टिस्को व्हॅली एमआरएफ कंपनीजवळ वाहनांवर झाड पडल्याचे वृत्त आहे. खाजन-पाळी येथेही वाहनांवर झाड कोसळण्याची घटना घडली. तालुक्यातील काही गावांमध्ये मंदिरे व अन्य संस्थांच्या कार्यक्रमावरही या अवकाळी पावसामुळे परिणाम जाणवला.