वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी ईडीविरोधात सादर केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मोईत्रा यांच्या चौकशीसंबंधीची गुप्त माहिती ईडीकडून प्रसार माध्यमांकडे उघड करण्यात आली. त्यामुळे ईडीविरोधात कारवाई करावी, अशी मागणी मोईत्रा यांच्या याचिकेत करण्यात आली होती. तसेच आपल्या चौकशीच्या संदर्भात कोणतीही माहिती प्रसार माध्यमांना न देण्याचा आदेश ईडीला देण्यात यावा, असेही त्यांचे म्हणणे होते. तथापि, त्यांची कोणतीही मागणी मान्य करता येणार नाही, असा निर्णय देण्यात आला.
आपली माहिती प्रसिद्ध करणाऱ्या प्रसार माध्यमांनाही तसे न करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणीही मोईत्रा यांनी केली होती. तीही फेटाळण्यात आली आहे. ईडीने मोईत्रा यांच्या विरोधात विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत प्रकरण सादर केले आहे. त्यासंबंधी त्यांना चौकशीसाठी समन्स धाडण्यात आले आहे. मोईत्रा यांच्या संबंधातील काही व्यवहार देशाबाहेर करण्यात आले आहेत. ते बेकायदेशीर आहेत, असा ईडीचा आरोप आहे. त्यामुळे चौकशी होत आहे.