पुणे / वार्ताहर :
मागील कित्येक दिवसांपासून आपण पाहतोय की पुण्यामध्ये कोयता गॅंगच्या हल्ल्याने पुणेकर दहशतीच्या सावटाखाली राहत आहेत. सांस्कृतिक आणि शांतताप्रिय असलेल्या शहराला ही बाब निश्तितच भूषणावह नाही. पुण्याची गरिमा आणि शांतता कायम ठेवण्यासाठी गृहविभागाने देखील याबाबत तातडीने धोरणात्मक पाऊले उचलावी यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी दिली.
चाकणकर म्हणाल्या, काही तरुण मुलं हातामध्ये कोयता घेऊन दिवसाढवळ्या राजरोसपणे दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बाब विधिमंडळात देखील चर्चिली गेली होती. तरीही हे प्रकार अजून थांबले नाहीत. पुणे शहरालगत असलेल्या गोर्हे बु. गावामध्ये या कोयता गँगने गावातील महिलांच्या अंगावर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार राज्य महिला आयोगाला प्राप्त झाली आहे. या कोयता गँगचा नंगानाच असाच चालू राहिला तर गावातील नागरिकांच्या विशेषतः महिलांच्या जीविताला धोका निर्माण होऊन कोणताही अनर्थ घडू नये यासाठी यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करण्याचे निर्देश पुणे ग्रामीण पोलिसांना दिले आहेत.
महिलेस मारहाण करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावात एका दुकानदाराकडून फुकट सिगारेट घेण्यासाठी तसेच एका महिलेने गाडी हळू चालव असे म्हटल्याचा राग येऊन काही सराईत गुंडांनी तलवार आणि कोयते काढून महिलेला मारहाण करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडीत सायंकाळी महिला आपल्या घरासमोर बसली होती. लहान मुले बाहेर खेळत होती. यावेळी काही तरुण रस्त्यावरून भरधाव दुचाकी चालवत होते. रस्त्यावर मुले खेळत असल्याने या महिलेने दुचाकीस्वार तरुणांना हटकले तसेच गाडी हळू चलवण्यास सांगितली. याचा तरुणांना राग आल्याने, त्यांनी महिलेला शिवीगाळ करत कोयते आणि तलवारी काढून मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ परिसरात व्हायरल झाला आहे.
संबंधित तरुण सराईत गुन्हेगार आहे. गांजाची नशा करून ते या गावात नेहमी दहशत निर्माण करत असल्याची तक्रार नागरिकांनी दिली. या आरोपींना पकडण्यासाठी दोन पथके रवाना केली आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे हवेली ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.