एस. एम. कृष्णा, कुमार मंगलम् बिर्ला, सुमन कल्याणपूर यांच्यासह मान्यवरांचा गौरव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रपती भवनातील एका समारंभात बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्म पुरस्कार विजेत्या मान्यवरांना गौरवित केले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा, प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला, प्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर, गुजरातमधील सामाजिक कार्यकर्त्या हिराबाईबेन लोबी यांना पुरस्कार प्रदान केले. तसेच अब्जाधीश शेअर बाजारातील गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बहुतांश केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
या वषीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी 106 पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली होती. त्यापैकी 50 हून अधिक जणांना बुधवारी पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असलेले आणि नंतर भाजपमध्ये सामील झालेले एस. एम. कृष्णा यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुमन कल्याणपूर यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला. तसेच प्रख्यात वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी (मरणोत्तर) यांनाही देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण जाहीर करण्यात आला होता.
पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार बुधवारी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात. पद्मविभूषण हा अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. तर उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार दिला जातो. तथापि, 2019 पासून भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणालाही देण्यात आलेला नाही.