दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात : लाखोंचे नुकसान
बेळगाव : शेट्टी गल्ली येथे कौलारू घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. शुक्रवारी दुपारी 11.30 च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत किल्लेकर यांच्या घरासह आजूबाजूच्या घरांनाही आगीमुळे धक्का पोहोचला आहे. या आगीमध्ये घराचे मोठे नुकसान झाले असून किल्लेकर कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. या आगीत घराचे 70 टक्के नुकसान झाले. या आगीच्या घटनेत गीता दीपक किल्लेकर, प्रभावती बाबुराव किल्लेकर, परशराम दत्तू किल्लेकर, रमेश दुर्गाडे यांच्या घराचे नुकसान झाले. त्यातच घरातील सिलिंडरला गळती लागल्याने आग अधिकच पसरली. अग्निशमन जवानांनी दोन बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. आगीत घरातील सोने, पैसे, शाळांची कागदपत्रे जळून नुकसान झाले. शेतीवर अवलंबून असणाऱ्या किल्लेकर कुटुंबीयांवर आता राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके व तहसीलदारांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला. नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आमदारांनी दिले.