ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातच CBSE च्या तीन शाळा बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 12 लाख रुपयांच्या मोबदल्यात या शाळांना CBSE ची मान्यता असल्याचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर पुण्यातील तीन शाळांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
एम. पी. इंटरनॅशनल स्कूल ऍन्ड ज्युनियर कॉलेज, शिवाजीनगर, क्रिएटिव्ह एज्युकेशन पब्लिक स्कूल ऍन्ड ज्युनियर कॉलेज आणि नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल ऍन्ड ज्युनियर कॉलेज या शाळांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहे. सीबीएससीच्या मान्यतेचे बनावट प्रमाणपत्र विकणारी टोळी सक्रिय असून, ही टोळी मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांचा वापर करत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश या शिक्षण उपसंचालक कार्यालयाला देण्यात आले आहेत.
अधिक वाचा : विदर्भात थंडीची लाट
पुण्यातील तीन शाळांबरोबरच पुणे जिल्ह्यातील आणखी बारा शाळांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे या घोटाळय़ाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.