भंडाऱ्याच्या उधळणीत भव्य मिरवणूक : विधिवत पूजा-धार्मिक कार्यक्रमांनंतर देवीचे सीमेकडे प्रस्थान
वार्ताहर /बाळेकुंद्री
ढोल व बॅन्डपथकाच्या गजरात, भंडाऱ्याची उधळण करत तल्लीन होऊन नाचणारे भाविक अशा उत्साही वातावरणात बुधवारी सुमारे हजारो भाविकांच्या उपस्थितीत लक्ष्मीदेवीच्या चरणी नतमस्तक होऊन यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली. बुधवारी यात्रेचा शेवटचा दिवस असल्यामुळे हुदली परिसर लक्ष्मीमातेच्या भक्तांनी भरला होता. सकाळपासूनच देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मंदिराभोवती स्त्रियांची उपस्थिती लक्षणीय होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास आरतीनंतर हक्कदार व ग्रामस्थांच्या उपस्थितीत देवीसमोर धार्मिक कार्यक्रम झाला. नंतर देवीची विधीपूर्वक पूजा अर्चा झाल्यानंतर उत्सवमूर्ती (होन्नाट)ला प्रारंभ झाला. यावेळी उत्सवमूर्तीची बसस्थानकाभोवती मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक बसस्थानकावर आली असता बेळगाव हुदली-अंकलगी मार्गावर एकच गर्दी झाली. त्यामुळे काहीवेळ वाहतूक खोळंबली होती.
भाविकांची एकच गर्दी
यात्रेच्या शेवटच्यादिवशी गोकाक, बेळगाव व विविध ठिकाणाहून आलेल्या भाविकांनी परिसर फुलून गेला होता. बेळगाव, खनगाव, मारिहाळ, सुळेभावीसह पूर्व भागातील स्थानिक भाविकही सायकल-दुचाकीने टेम्पो, पायवाटचा आधार घेत हुदली गाठल्याने लक्ष्मी मंडप परिसर गर्दीनी फुलून गेला होता. यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मारिहाळ पोलीस ठाण्याचे सीपेआय गुरुराज कल्याणशेट्टी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.