संशोधक झाले अवाप्
एका सरोवराच्या तळाला शेकडो वर्षे जुन्या जहाजाचे अवशेष सापडले आहेत. मोठा कालावधी उलटल्यावरही जहाज अत्यंत चांगल्या स्थितीत आढळले आहे. या जहाजासाठी जणू काळ थांबला होता असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
हे जहाज नॉर्वेतील सर्वात मोठे सरोवर मिओसाच्या तळाला सापडले आहे. जहाजाचे अनोखे डिझाइन या सरोवराच्या सागरी इतिहासाची साक्ष देतात. हे जहाज 1300 ते 1800 शतकामधील असल्याचे सांगण्यात येत आहे. संशोधकांनी मिशन मिओसा प्रोजेक्ट अंतर्गत हा शोध लावला आहे. या मोहिमेचा उद्देश 363 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेल्या या सरोवराच्या तळाशी लपलेल्या रहस्यांना हाय रिझोल्युशन सोनार टेक्नोलॉजीद्वारे शोधणे आहे.
दोन महिन्यांपर्यंत सरोवराच्या तळाचे निरीक्षण केले असता युद्धसामग्री मिळाल्यावर नॉर्वे संरक्षण संशोधन संस्थेने ही मोहीम सुरू केली होती. नार्वे युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीनुसार हे सरोवर पिण्याच्या पाण्याचे एक मोठे स्रोत आहे, या सरोवरातून देशातील सुमारे 1 लाख लोकांपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. याचमुळे यात युद्धसामग्री असल्यास लोकांची प्रकृती बिघडण्याची भीती होती.
जहाजाचे अवशेष सरोवराच्या सर्वेक्षणादरम्यान मिळाले आहेत. युद्धसामग्रीचा शोध घेताता जहाजाचे अवशेष मिळण्याची अपेक्षा होती आणि हेच घडल्याचे उद्गार नॉर्वे युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ संशोधक आणि या मोहिमेचे मुख्य शोधकर्ते ओयविंद ओडेगार्ड यांनी काढले आहेत.
जहाजाचे हे अवशेष 1350 फूट खोलवर सापडले आहेत, या जहाजाची लांबी 33 फूट असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वच्छ पाण्यामुळे हे जहाज स्वतःच्या जवळपास मूळ स्वरुपात दिसून येते. परंतु काही लोखंडी खिळय़ांना गंज लागली आहे.
जहाजाचे डिझाइन पाहून ते 1300-1800 मधील असावे असा अनुमान पुरातत्व विभागाने व्यक्त केला आहे. खराब हवामानामुळे हे जहाज बुडाले असावे असे ओडेगार्ड यांचे मानणे आहे.