बैलहोंगल तालुक्यातील हणबरहट्टीत घटना
बेळगाव : पती-पत्नीच्या किरकोळ वादातून पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना बुधवार दि. 22 रोजी रात्री 11.15 वाजता हणबरहट्टी, ता. बैलहोंगल येथे घडली. फकिरव्वा यल्लाप्पा खाकी (वय 36) असे घटनेत मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. घटनेची नोंद नेसरगी पोलीस स्थानकात झाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री पती यल्लाप्पा व पत्नी फकिराव्वा यांच्यामध्ये किरकोळ कारणातून वादावादी झाली होती. या वादातूनच यल्लाप्पाने पत्नी फकिराव्वाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केल्याने तिचा झोपलेल्या ठिकाणीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नेसरगी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक राघवेंद्र हवालदार, डीएसपी पांडुरंगय्या, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती एन. यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नेसरगी पोलिसांनी घटनेचा अधिक तपास हाती घेतला आहे. खुनानंतर यल्लाप्पा फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.