प्रतिनिधी /मडगाव
हुंडय़ासाठी पत्नीचा छळ केल्याच्या आरोपावरुन सांगे न्यायालयाने पती असलेल्या म्हार्दोळ येथील साईनाथ खांडेपारकर याला 2 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली असून शिवाय 5 लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला आहे.
सांगे न्यायालयाच्या न्यायाधीश सुनिता गावणेकर यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. निर्धारित वेळेत पाच लाखांची रक्कम जमा न केल्यास आणखी एक वर्ष सक्त कारवावासाची शिक्षा भोगावी, असे आदेशात म्हटले आहे.
अडवणे, मारहाण करुन जखमी करणे, शिवीगाळ करणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरुन न्यायालयाने आरोपी साईनाथ खांडेपारकर याला 5 हजार रुपये जमा करण्याचाही आदेश दिला आहे.
सासूलाही बसून राहण्याची शिक्षा
सासू शांता खांडेपारकर हिला न्यायालय उठेपर्यंत कोर्टात बसुन राहण्याची शिक्षा ठोठावली. शावाय भारतीय दंड संहितच्या 323, 341, 504 आणि 506(2) कलम (प्रत्येकी ) 5 हजार रुपये जमा करण्याचा आदेश दिला.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रानुसार या दोन्ही संशयित आरोपींना 27 जुलै 2019 रोजी अटक केली होती आणि नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार जामिनावर सोडून देण्यात आले होते. आरोपपत्रानुसार मे 2013 ते 10 नोव्हेंबर 2017 दरम्यान ही घटना घडली होती. हुंडय़ासाठी तक्रारदार सुनेचा छळ केल्याच्या आरोपावरुन त्याचप्रमाणे मारहाण करुन तिला जखमी केल्याच्या आरोपावरुन कुळे पोलिसानी भारतीय दंड संहितेच्या 323, 504, तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला होता.
शिक्षा 30 दिवसासाठी स्थगित
या न्यायालयाने दिलेली शिक्षा स्थगित करण्याची विनंती आरोपींच्यावतीने न्यायालयास करण्यात आली तेव्हा या न्यायालयाने 30 दिवसासाठी ही शिक्षा स्थगित ठेवत असल्याचे म्हटले आहे. सरकारची बाजू सरकारी वकिल सॅन्फर्ड फर्नांडिस यांनी मांडली.