नगरनियोजन मंत्र्यांनी कारवाई करून दाखवावी: आयरीश
पणजी : पर्वरी मतदारसंघात पेन्ह द फ्रान्स पंचायत क्षेत्रात एका डोंगरावर बांधण्यात येत असलेले राजवाडासदृष्य घराचे बेकायदेशीर बांधकाम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नगरनियोजन मंत्र्यांनी या बांधकामावर कारवाई करून दाखवावी, असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते आयरीश रॉड्रिगीश यांनी दिले आहे. पूर्णत: बेकायदेशीर असलेले सदर बांधकाम एका वजनदार राजकीय नेत्याने सत्तेचा पूर्ण दुऊपयोग करून बांधले असल्याचा दावा आयरीश यांनी केला आहे. प्रचंड उंचीच्या डोंगराच्या सुळक्यावर जागा सपाट करून सदर हवेलीचे बांधकाम आरंभण्यात आले असून त्याची उपग्रहाद्वारे काढण्यात आलेली छायाचित्रे आयरीश यांनी जाहीर केली आहेत. सदर बांधकाम करताना कायद्याचे पूर्णत: उल्लंघन आणि सत्तेचा घोर दुऊपयोग करणारे आहे. तेथे चाललेली एकही गोष्ट कायद्याला धरून नाही. अशा बेकायदेशीरपणात गुंतलेला सदर वजनदार राजकीय नेता स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी भाजपच्या गोटात सामील झाला असून त्यांच्याच आशीर्वादाने ही कृत्ये करत आहे, असे आयरीश यांनी म्हटले आहे. राज्यात बेकायदेशीर कृत्यांना थारा देणार नाही असे वारंवार सांगणारे नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी आता पेन्ह द फ्रान्स पंचायत क्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे धाडस दाखवावे असे आव्हान आयरीश यांनी दिले आहे.