ग्रामस्थांकडून विरोध : नाहरकत दाखला बेकायदेशीर : नवीन पंचायत मंडळ स्थापन झाल्यानंतर योग्य निर्णय घेणार
प्रतिनिधी / पेडणे
तुये पंचायत क्षेत्रातील डॉन बॉस्को हायस्कूलच्या परिसरात गुरुवारी 11 रोजी बेकायदा डोंगर तसेच झाडे कापणी सुरू केली. ते काम संतप्त ग्रामस्थांनी रोखले आणि वनखात्यासह पोलिसांकडे फोनवरून तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी जेसीपी यंत्रणा ताब्यात घेतली.
तुये पंचायत क्षेत्रातील डोंगर माळरानावर बेकायदा डोंगर कापणी आणि झाडे कापण्याचे काम सुरू केले. याची रितसर चौकशी करावी, अशी मागणी माजी सरपंच किशोर नाईक, माजी सरपंच उल्हास नाईक, माजी पंच सदस्य उदय मांदेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी केली आहे.
या पंचायत क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात बेकायदा डोंगर कापणी केली जात होती. त्याच प्रमाणे झाडांची कत्तलही सुरू होती. याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर ग्रामस्थ एकत्रित येऊन काम रोखले. सुरुवातीला ग्रामस्थानी वनखात्याला माहिती दिली. पोलिसांना याविषयी फोनद्वारे कळवून् तक्रार केली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी जेसीपी यंत्र ताब्यात घेतले.
नगर नियोजन मंत्र्यांनी कारवाई करण्याची मागणी
नगर नियोजन मंत्री मंत्री विश्वजित राणे यांनी या बेकायदा डोंगर कापणीकडे लक्ष देऊन संबधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
दरम्यान या जागेत एका खासगी कंपनीला बांधकाम करण्यास परवानगी पंचायतीने दिल्याचा कंत्राटदाराने यावेळी ग्रामस्थाना सांगितले. पंचायतीचा ‘ना हरकत’ दाखला हा बेकायदा असल्याचे सांगून या विषयावर पंचायत मंडळ स्थापन झाल्यानंतर खास ग्रामसभा बोलावून यावर योग्य निर्णय घेतला घेतला जाईल. अशी माहिती माजी सरपंच किशोर नाईक गावकर, माजी सरपंच उल्हास नाईक, माजी पंच उदय मांजरेकर यांनी दिली.