ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात इस्लामाबाद येथील ट्रायल कोर्टाने 3 वर्षांचा कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इम्रान खान यांनी दंड भरण्यास नकार दिल्यास त्यांची शिक्षा पुढे सहा महिने वाढू शकते, असेही कोर्टाने म्हटले आहे.
इम्रान खान यांनी जाणीवपूर्वक तोशाखाना भेटवस्तूंचे बनावट तपशील सादर केले होते. ते भ्रष्ट व्यवहारांसाठी दोषी ठरले आहेत, असे स्पष्ट करत ट्रायल कोर्टाचे न्यायाधीश हुमायून दिलावर यांनी इम्रान खान यांना 3 वर्षांच्या कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर इस्लामाबाद पोलिसांनी इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. दरम्यान, इम्रान खान यांना त्यांच्या जमान पार्क येथील घरातून अटक करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. केर्टाच्या निर्णयानंतर इम्रान यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली आहे. पुढील 5 वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही.
काय आहे तोशाखाना प्रकरण?
तोशाखाना हा पाकिस्तानमधील एक सरकारी विभाग आहे. ज्यामध्ये सरकारांचे प्रमुख, राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, नोकरशहा आणि अधिकाऱ्यांना परदेशी मान्यवरांनी दिलेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात.
इम्रान खान यांना 2018 मध्ये सत्तेवर आल्यानंतर अरब शासकांकडून अनेक महागडय़ा भेटवस्तू मिळाल्या. त्यामधील कफलिंकची एक जोडी, महागडा पेन, एक अंगठी आणि 4 रोलेक्स घडय़ाळे अशा काही वस्तू तोशाखान्यात ठेवण्यात आल्या होत्या. तर काही भेटवस्तू इम्रान खान यांनी जाहीर केल्या नव्हत्या. दरम्यान, तोशाखान्यात ठेवलेल्या वस्तू इम्रान खान यांनी कमी किंमतीत विकत घेतल्या. तसेच त्या चढय़ा भावाने इतरांना विकल्या असा त्यांच्यावर आरोप होता. हा आरोप इस्लामाबाद येथील ट्रायल कोर्टात सिद्ध झाला. त्यानंतर इम्रान खान यांना शिक्षा सुनावण्यात आली.