परिसरातील बंगल्याच्या खिडक्यांच्या काचा फुटून नुकसान
पेठ वडगाव / प्रतिनिधी
पेठ वडगाव येथे पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत धुवाधार पावसाने झोडपून काढले. या दरम्यान सात वाजण्याच्या सुमारास पेठ वडगाव येथील श्री रामनगर येथे पडलेल्या वीजेमुळे फटाका व्यावसाईक शिकलगार यांनी वीट व मातीमध्ये बांधलेली खोली जमीनदोस्त झाली. तर परिसरातील बंगल्याच्या खिडक्यांच्या काचाना तडे गेले. परिसरातील सहा ते सात घरांच्या काचांना तडे जावून नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पेठ वडगाव परिसराला पहाटे पाच वाजल्यापासून धुवाधार पावसाने झोडपले. या दरम्यान मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होता दरम्यानच्या काळात सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास विजेचे प्रचंड कडकडाट होवून फटाका व्यावसाईक बंडूलाल शिकलगार यांचे लाटवडे रोडवर श्रीरामनगर येथे असलेले वीट मातीने बांधलेल्या साध्या बांधकामातील खोलीवर वीज कोसळली. यावेळी प्रचंड आवाज झाला. यावेळी श्रीरामनगर भूमीनंदन कॉलनी, शिवाजीनगर परिसर हादरला. वीज पडल्याने हादऱ्याने परिसरात शिकलगार यांच्या बंगल्सयासह अन्य बंगले व घरांच्या काचा फुटून तसेच टीव्ही व इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होवून मोठे नुकसान झाले. विज पडल्यानंतर झालेला मोठ्या आवाजाने परिसरातील नागरिक भयभीत झाले.या घटनेची माहिती होताच महसूल विभागाचे अधिकारी व वडगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती घेतली. घटनास्थळी नागरिक गर्दी करत असल्याने पोलिस व महसूल विभागाने बॅरिकेट लावून घटनेचा पंचनामा केला.