पटवर्धन हायस्कूलमधील प्रकार, ताकीद देऊनही पुरवठादार संस्था बेदरकार, नगर परिषदेच्या पाहणी पथकाच्या निदर्शनास आली बाब
प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील शालेय पोषण आहार वाटपातील गोंधळ थांबण्याची चिन्हे नाहीत. पटवर्धन हायस्कूल येथे शनिवारीही दर्जाहीन आहार वाटप झाल्याची बाब प्रशासन स्तरावरून नेमण्यात आलेल्या पथकाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे आहार पुरवठादार ठेकेदार संस्थाच्या गलथान कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
शहरातील शाळांमध्ये सेंट्रल किचन पध्दतीने पोषण आहार पुरवठ्याच्या पहिल्याच दिवशी शिर्के प्रशाला, त्यानंतर तिसऱ्या दिवशी दामलेहायस्कूलमध्ये अनियमितता आढळून आली. अर्धवट शिजलेला व दर्जाहीन पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत होता. याबाबत शाळांकडून प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर पटवर्धन हायस्कूल येथेही अपुरा आहार पुरवठा झाला होता. दरम्यान पटवर्धन हायस्कूल येथे एका विद्यार्थ्यांच्या आहारात अळी देखील सापडली होती. त्याची तक्रार नगर परिषद प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.
आहार वाटपात सातत्याने होत असलेली अनियमितता, गोंधळ व दर्जाहीनतेवर नजर ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने पथकाची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना आहार वाटपाची पाहणी त्या-त्या शाळांना भेट देऊन केली जाणार आहे. या पथकामध्ये नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली कर प्रशासकीय अधिकारी आय.व्ही.चाळके, मालमत्ता पर्यवेक्षक नंदकुमार पाटील या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांमार्पत तसेच शिक्षकांमार्पत पोषण आहार पुरवठ्यावर नजर ठेवण्यात येत आहे.