न्यू गुड्सशेड रोड येथील घटना : 9 तोळे दागिने पळविले
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या एका 80 वर्षीय वृद्धेच्या अंगावरील 9 तोळ्याचे दागिने लुटण्यात आले आहे. न्यू गुड्सशेड रोड, तिसरा क्रॉस परिसरात गुरुवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून शुक्रवारी या संबंधी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.
शकुंतला भीमराव यादव (वय 80, रा. न्यू गुड्सशेड रोड) या वृद्धेने दिलेल्या फिर्यादीवरून खडेबाजार पोलीस स्थानकात तिघा अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
उपलब्ध माहितीवरून गुरुवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास शकुंतला लघुशंकेसाठी घराबाहेर आल्या. त्यावेळी पायी चालत आलेल्या तिघा अज्ञातांनी त्यांना पकडून त्यांच्या अंगावरील चेन, कर्णफुले, बांगड्या असे सुमारे 94.3 ग्रॅमचे दागिने हिसकावून घेतले. दागिने काढून घेतल्यानंतर शकुंतला यांना बोलता येवू नये यासाठी कपड्याने त्यांचे तोंड बांधण्यात आले.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या शकुंतला यांनी घरात जाऊन आपला मुलगा व सुनेला उठविले. घडला प्रकार सांगितला. तोपर्यंत दागिने लुटणाऱ्या भामट्यांनी तेथून पलायन केले होते. शुक्रवारी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.