पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती : नैर्त्रुत्य रेल्वेकडून जय्यत तयारी
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, येत्या 27 फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेकडून जय्यत तयारी केली जात आहे. पंतप्रधान शिमोगा विमानतळाच्या उद्घाटनानंतर बेळगावमध्ये येणार आहेत. रेल्वेस्थानकाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, यासाठी बऱ्याच दिवसांपासून पंतप्रधानांची वेळ मागून घेतली जात होती. परंतु त्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटनासाठी विलंब होत होता. अखेर सोमवार दि. 27 रोजी शिमोगा विमानतळाच्या उद्घाटनानंतर दुपारी 2.15 वा. पंतप्रधान बेळगावमध्ये दाखल होतील. दुपारी 3.30 पर्यंत उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना होतील.
2018 पासून रेल्वेस्थानकाच्या नुतनीकरणाचे काम सुरू झाले. तत्कालीन रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला होता. बेळगावचे खासदार कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून रेल्वेस्थानकाला अत्याधुनिक रूप देण्याच्या कामाला सुरुवात झाली. परंतु काही दिवसात आलेले लॉकडाऊन व त्यानंतर सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रेल्वेस्थानकाच्या कामाची गती मंदावली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली. एकूण 210 कोटी रुपये खर्च करून रेल्वेस्थानकाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. तळमजला व त्यावर तीन मजली मुख्य इमारत बांधण्यात आली आहे. या बांधकामासाठी 44.9 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. एखाद्या विमानतळाच्या टर्मिनलप्रमाणे मुख्य प्रवेशद्वाराची रचना करण्यात आली आहे. रेल्वेस्थानकात एसी व नॉन एसी वेटींग रूम, फूड कोर्ट, सरकते जिने, दक्षिण प्रवेशद्वार निर्माण करण्यात आले आहे. याचबरोबर यापुढे रेल्वेस्थानकावर चार प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत.
पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक झाली. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. नूतन रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याबरोबरच कृषीसह वेगवेगळ्या कार्यक्रमात ते भाग घेणार आहेत. व्यासपीठाची उभारणी, पार्किंग, वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासंबंधी तयारी करण्याची सूचना देण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल बोयार, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी हरिता, पोलीस उपायुक्त शेखर एस. टी., अप्परजिल्हाधिकारी के. टी. शांतला, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदींसह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी उत्तमपणे पार पडावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.