मंदिर बांधकामासाठी सहकार्य केलेल्यांचा बांधकाम समितीच्या वतीने गौरव : देवदेवतांना अभिषेक, मिरवणूक कार्यक्रम
वार्ताहर /जांबोटी
ओलमणी येथील जीर्णोद्धारीत कालिकादेवी व नूतन विठ्ठल-रखुमाई मंदिराचे उद्घाटन नुकतेच उत्साहात झाले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष ज्योतिबा नावलकर होते.
यावेळी जि. पं. माजी सदस्य विलास बेळगावकर यांनी, मंदिरे ही भारतीय संस्कृतीची प्रतीके आहेत. मंदिराच्या माध्यमातून सुसंस्कारित आणि चारित्र्यसंपन्न समाजाची निर्मिती झाली पाहिजे. तसेच गावकऱयांनी मंदिराबरोबरच ज्ञानमंदिराचा देखील विकास करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालावी, असे आवाहन केले.
प्रारंभी मारुती साबळे यांनी प्रास्ताविक केले. मंदिर बांधकाम समितीचे सदस्य अशोक जगताप, अंबाजी चव्हाण, खाचाप्पा काजुणेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी पुणे येथील उद्योजक राघोबा चव्हाण, नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे निवृत्त अधिकारी जोतिबा खाडे, सुधीर नावलकर, वायुसेनेचे निवृत्त अधिकारी प्रभाकर जगताप आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी कालिकादेवी मंदिराच्या गाभाऱयाचे उद्घाटन सेवानिवृत्त तहसीलदार मोतीराम चव्हाण तसेच विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या गाभाऱयाचे उद्घाटन अमृत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठल-रखुमाई मंदिराचे उद्घाटन जय हनुमान सोसायटीचे अध्यक्ष शाहू राऊत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी मंदिर बांधकामासाठी सहकार्य केलेल्यांचा मंदिर बांधकाम समितीच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामस्थांच्यावतीने मंदिर बांधकाम समितीच्या सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पंचायत माजी सदस्य जयराम देसाई, लक्ष्मण बामणे, ता. पं. माजी सदस्य पुंडलिक पाटील, म. ए. समिती युवा कार्यकर्ते प्रकाश चव्हाण, लैला शुगरचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील, जाबोटी ग्रा. पं. उपाध्यक्षा मयुरी सुतार आदी मान्यवर तसेच बहुसंख्य ग्रामस्थ, भक्तमंडळी उपस्थित होती. सूत्रसंचालन हणमंत जगताप तर आभार अशोक जगताप यांनी मानले.
विविध धार्मिक कार्यक्रम
मंदिर उद्घाटनानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये गावातील सर्व देवदेवतांना अभिषेक तसेच गावातील मंदिरांमध्ये ध्वजारोहण व गावात मंगल कलश, कासव मिरवणूक काढण्यात आली. झी टॉकीज फेम युवा महिला कीर्तनकार नेहाताई भोसले यांचे कीर्तन झाले. तरुण नाटय़ मंडळाच्यावतीने सरनोबत हा नाटय़प्रयोग सादर करण्यात आला.