अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन : राष्ट्रनिर्मितीत असणार भूमिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे मंगळवारी राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेचे (एनटीआरआय) उद्घाटन केले आहे. ही संस्था आदिवासी जीवनशैलीच्या सामाजिक-आर्थिक पैलूंमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अध्ययन आणि कार्यक्रम तयार करणार आहे. एनटीआरआय राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख संस्था राहणार असून शैक्षणिक, कार्यकारी क्षेत्रामध्ये आदिवासी समुदायाच्या चिंता, मुद्यांवर विचार करणारे प्रमुख केंद्र ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजननुसार राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था अखेरीस अस्तित्वात आली आहे. अशा संस्थांची राष्ट्राच्या उभारणीत भूमिका असते. देशातील वैविध्यांना जोडले न गेल्यास समग्र देशाच्या आदिवासी समाजाच्या विकासाचे स्वप्न अपूर्णच राहते. राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था ही या वैविध्यांना जोडण्याचे काम करत आदिवासी समुदायाचा विकास साकार करण्यास मोठी भूमिका पार पाडणार आहे. 24 हून अधिक आदिवासी संशोधन संस्था वेगवेगळय़ा नावांनी काम करत आहेत, परंतु त्यांना राष्ट्रीय स्वरुपात जोडणारा बंध नव्हता. आमचा आदिवासी समुदाय वैविध्यपूर्ण असल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत.
ही संस्था प्रतिष्ठित संशोधन संस्था, विद्यापीठ, संघटना, शैक्षणिक शाखांसोबत सहकार्य करणार आहे. एनटीआरआय आदिवासी संशोधन संस्था (टीआरआय), उत्कृष्टता केंद्रे (सीओई) तसेच अन्य प्रकल्पांवर देखरेख ठेवणार आहे. तसेच संशोधन आणि प्रशिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा व्हावी म्हणून मापदंड निश्चित करणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. आदिवासी कार्य मंत्रालय तसेच राज्य कल्याण विभागांना धोरणात्मक सहकार्य या संस्थेकडून करण्यात येणार आहे.