खासदार मंगला अंगडी यांच्याकडून कौतुक : नागरिकांना सेवासुविधा पुरविण्यात तत्पर
बेळगाव : बेळगाव पोस्ट विभागाच्यावतीने शनिवारी मुख्य पोस्ट ऑफीसच्या आवारात ‘पोस्ट जनसंपर्क अभियाना’चे उद्घाटन करण्यात आले. खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष चन्नबसप्पा होनकट्टी व पोस्ट अधीक्षक विजय वडोनी उपस्थित होते. खासदार मंगला अंगडी यांनी बेळगाव पोस्ट विभागाचे कौतुक करत सुरू केलेल्या उपक्रमाबद्दल आभार मानले. केवळ पोस्ट आणि मनीऑर्डरपुरता मर्यादित असणारे हे खाते आता मात्र नागरिकांना अनेक सेवासुविधा पुरवत आहे. दिवंगत सुरेश अंगडी यांनी पोस्ट विभागाच्या नूतनीकरणासाठी अनेक प्रयत्न केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
चन्नबसप्पा होनकट्टी म्हणाले, बेळगावमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र व पोस्टमन पुतळा उभारण्यामध्ये सुरेश अंगडी यांचे महत्त्वाचे कार्य होते. आज पोस्ट ऑफीसमध्ये पासपोर्ट, गंगाजल, रेल्वेतिकीट बुकिंग, विमा, बँकिंग सेवा दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. विजय वडोनी यांनी पोस्ट अभियानाविषयीची माहिती दिली. या कार्यक्रमाला साहाय्यक पोस्ट अधीक्षक एम. जाफर, प्राचार्य तिप्पेस्वामी, सुधीर काकडे, रूपेश दुर्गाई, महादेव शिरूर, राजेश मोकाशी यासह इतर उपस्थित होते. मंजू अंगडी यांनी सूत्रसंचालन केले तर किशोर देशपांडे यांनी आभार मानले.