‘सीएसआर’ अतंर्गत ‘हिरो’ ने दिलेल्या दुचाकी पडून : गोवा पोलीस खात्याचा सुस्त कारभार चव्हाटय़ावर
प्रतिनिधी /पणजी
पोलीस खात्यात 100 नव्या कोऱया दुचाकी धुळखात पडलेल्या आहेत. नंबर लावून लेबलिंगची कामेही पूर्ण झालेली असताना या दुचाकी पोलिसांना वापरायला का दिल्या जात नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. ही वाहने अशीच ठेवली तर ठेवलेल्या ठिकाणीच गंजून जाण्याची किंवा इंजिन घट्ट होऊन खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उद्योजकांची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) म्हणजे उद्योजकांनी आपल्या वार्षिक नफ्यातील 2 टक्के रक्कम सामाजिक कामासाठी द्यावी, या सरकारच्या नियमानुसार, हिरो कंपनीने पोलीस खात्याला विविध प्रकारच्या वाहनांची गरज असल्याचे ओळखून 100 दुचाकी दिल्या आहेत. त्या दुचाकींचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते 10 नोव्हेंबर 2022 रोजी उद्घाटन करून पोलीस खात्याच्या ताब्यात दिल्या आहेत. त्या दिवशी काही वाहने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित चालविण्यात आली, त्यांचे फोटो वृत्तपत्रांतून झळकले आणि त्यानंतरपासून त्या धुळखात पडलेल्या आहेत.
राज्यात सध्या पर्यटन हंगाम जोरात सुरु आहे. देशी, विदेशी मोठय़ा प्रमाणात पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या वेशात अनेक गुन्हेगार तसेच चोरटेही गोव्यात दाखल झाले आहेत. अशा स्थितीत पोलीस खात्याची जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे पोलीस सगळ्या गोष्टीनी सुसज्ज असणे फार महत्वाचे आहे. मग पोलीस मुख्यालयाच्या मैदानाजवळ धूळखात पडलेल्या दुचाकी ज्या पोलीस स्थानकाला किंवा ज्या पोलीस विभागाला गरज आहे त्यांना का वितरीत केल्या जात नाहीत, असा प्रश्न निर्माण होत आहे.