अचानक धाडीमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ : दिवसभर कागदपत्रांची करण्यात आली तपासणी
प्रतिनिधी / निपाणी
येथील यरनाळ रोडनजीक असलेल्या हिरा पानमसाला या कारखान्यावर गुऊवारी पहाटे अचानक आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती देण्याबाबत कमालीची गुप्तता पाळली. गुऊवारी रात्री उशिरापर्यंत कडेकोट बंदोबस्तात सदर कारखान्यामध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू होती.
याबाबत समजलेली माहिती अशी की, येथील यरनाळ रोडनजीक असलेल्या लेटेक्स कॉलनी परिसरात हिरा पानमसाला हा कारखाना आहे. गेल्या वीस वर्षांपासून येथे पानमसाल्याचे उत्पादन होते. या ठिकाणी शंभरहून अधिक कामगार आहेत. बेळगाव जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातही या पानमसाल्याची विक्री होते. यातून याठिकाणी कोट्यावधी ऊपयांची उलाढाल होते.
माहिती देण्यास टाळाटाळ
दरम्यान, गुऊवारी पहाटे अचानक पुण्याहून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी यरनाळ रोडनजीकच्या परिसरात असलेला हा पानमसाल्याचा कारखाना तसेच कारखान्यापासून 100 मीटर अंतरावर असलेले गोडाऊन याबरोबरच सदर कारखान्याशी संबंधित असलेला व ताशिलदार प्लॉट येथे वास्तव्य असलेल्या याकुब उस्ताद याच्या घरात अशा तीन ठिकाणी एकाचवेळी धाड टाकली. आयकर विभागाचे सुमारे 10 अधिकारी, 15 कर्मचारी व जिल्हा राखीव पोलीस दलाचे 50 सशस्त्र जवान यांच्या ताफ्याने अचानक केलेल्या या कारवाईमुळे एकच गोंधळ उडाला.
यासंदर्भात अधिक माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. सध्या कागदपत्रांची तपासणी सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर याविषयी माहिती देऊ असे सांगितले. शहर व उपनगरातील व्यावसायिकांमध्ये या घटनेची दिवसभर चर्चा सुरू होती.
यापूर्वीही अनेकदा धाडी
सदर कारखान्यावर यापूर्वीही अनेकदा धाडी पडल्या आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी विक्रीकर विभागाच्यावतीने या ठिकाणची चौकशी करण्यात आली होती. पुन्हा एकदा गुऊवारी झालेल्या या कारवाईमुळे हा कारखाना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारखान्याच्या चहुबाजूनी पोलिसांचा वेढा तर कारखान्याचा मुख्य प्रवेश दरवाजा बंद ठेवून आतमध्ये अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू होती.