विनोद सावंत, कोल्हापूर
Increase in Channel Rates : केबल टिव्ही (Cable TV) पाहणे आता महागले आहे. दर महिन्यांच्या केबल भाड्यात आता 20 ते 30 रूपयांनी वाढ झाली आहे. चॅनलने पॅकेजचे दर वाढ केल्याने केबल सिस्टीम आणि केबल ऑपरेटरना ही वाढ करावी लागली आहे. पाच वर्षानंतर दरवाढ झाली आहे. (Cable TV Channel Rates Increase After Five Years)
केबल टिव्हीची भरमसाठ वाढणाऱ्या दरावर नियंत्रण ठेवण्याचे काम ट्राय (टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया) कडून केले जाते. पूर्वी ठराविक चॅनल जरी पाहत असला तरी सर्व चॅनेलचे पैसे केबल चालक आकरत होते. ट्रायने 1 फेब्रुवारी 2019 मध्ये नियमात बदल केले. ग्राहकांना पसंतीनुसार चॅनल निवडण्याची मुबा दिली. यानंतर चॅनल कंपनी वारंवार दर वाढीचा विषय पुढे करत होती. भरमसाठ दर वाढ प्रस्तावित केली जात होती. परंतू ट्रायने ही दरवाढ रोखली होती. मात्र, यावर्षी चॅनेलच्या दर वाढीस मंजूरी दिली असून त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून केली आहे. कोल्हापुरात मागील महिन्यांपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे केबल दरात पॅकेजनुसार महिन्याला 20 ते 30 रूपयांने वाढ झाली आहे.
काहींनी पे चॅनल्सच केले कमी
केबल ऑपरेटरनी ग्राहकांना सध्याचे पॅकेजमध्ये 20 ते 30 रूपये वाढ केली आहे. यामध्ये काही ग्राहकांनी नाईलजस्तव वाढीव दरानुसार पैसे देणे सुरूही केले आहे. परंतू काही ग्राहकांनी आहे त्याच दरात केबल घेण्यासाठी ठराविक पे चॅनलच पॅकेजमधून वगळले आहेत.
केबल चालकांचाही सर्व्हींस चार्ज
सिटी केबल सिस्टीम व्यवस्थापनाने ग्राहकांच्या सोयीसाठी चॅनलचे पॅकेज (बुके) तयार केले आहेत. यामध्ये 153 पासून 500 रूपयांपर्यंत पॅकेज आहेत. या पॅकेजवर 20 ते 30 रूपये स्थानिक केबल चालक सर्व्हीस चार्ज लावतात. महिन्याचा मेंटनन्स, कामगार पगार खर्च करून शिल्लक राहणारे त्यांचे उत्पन्न असते. चॅनेलने पॅकेजचे दर वाढविले मात्र, फायदा तेवढाच असल्याचे म्हणणे केबल ऑपरेटरांचे आहे.
पे चॅनेलच्या पॅकेजचे महिन्याचे सुधारित दर
चॅनल पूर्वीचे दर सध्याचे दर
डिस्कव्हरीचा पॅक 8 रूपये 15
सोनी टिव्ही पॅक 38.5 46
कलर्स पॅक 22 27
झी पॅक 39 49
स्टारचा पॅक 49 62
मग पसंतीनुसार चॅनेलची निवड कशी?
केबल चालकाचा यापूर्वी फिक्स भाडे होते.यामध्ये जे पाहणार नाही त्या चॅनेलचीही पैसे ग्राहकांना द्यावे लागत होते. यामुळेच ट्रायने पसंतीनुसार चॅनेल घेण्याची नियमावली केली.यामध्ये जे चॅनेल पाहणार त्याचेच पैसे पेड करणे उद्देश होता.परंतु केबल सिस्टीम चालकांनी ग्राहकांच्या मागणीनुसार स्वतंत्र चॅनेल दिले जात नसून त्यांनी केलेल्या पॅकेज घ्यावे लागतात.मग पसंतीनुसार चॅनेलची निवड कशी असा सवाल उपस्थित होतो.स्वतंत्र चॅनेल घेतले तर ग्राहकांना आणखीन महागत पडत असल्यानेच पॅकेज तयार केल्याचा दावा ते करत आहेत.
सध्याचे पॅकेज आणि मिळणारे चॅनेल
153 रूपयांचा पॅक -200 हून अधिक मोफत चॅनल
220 रूपयांचा पॅक -222 चॅनल (27 पे चॅनल)
270 रूपयांचा पॅक -255 चॅनल (60 पे चॅनल)
315 रूपयांचा पॅक -272 चॅनल (77 पे चॅनल)
350 रूपयांचा पॅक-295 चॅनल (100 पे चॅनल)
400 रूपयांचा पॅक -293 चॅनल (98 पे चॅनल)
500 रूपयांचा पॅक -304 चॅनल (109 पे चॅनल)
सेट टॉप बॉक्सचा केबल चालकांना फटका
पूर्वी केबल चालकांना एका कनेक्शनमागे किमान 100 रूपयांचा फायदा होत होता.त्यांच्या सर्वच कनेक्शनची नोंद सिटी केबल अथवा करमणुक कर विभागाकडे नसल्याने हे शक्य होते.आता सेट टॉप बॉक्स आल्याने सर्वच कनेक्शनची अधिकृत नोंदणी होते.त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत केबल चालकांचा फायदा कमी झाला आहे.