1 नोव्हेंबरपासून आरबीआयचा प्रायोगिक प्रकल्प सुरू
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशाचे डिजिटल चलन ‘डिजिटल रुपया’चा पहिले प्रायोगिक परीक्षण मंगळवार म्हणजेच एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. 9 बँका सरकारी सिक्युरिटीजमध्ये देवाणघेवाणीसाठी या डिजिटल चलनाचा वापर करणार आहेत. डिजिटल रुपयाचा पहिले प्रायोगिक परीक्षण मंगळवारपासून सुरू होणार असल्याचे आरबीआयने सोमवारी म्हटले आहे.
आरबीआयने ‘केंद्रीय बँक डिजिटल चलन’ आणण्याच्या स्वतःच्या योजनेच्या दिशेने पाऊल टाकत डिजिटल रुपयाचे प्रायोगिक परीक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. घाऊक व्यवहारांसाठी होणाऱया या परीक्षणात 9 बँका सहभागी होणार आहेत. या बँकांमध्ये एसबीआय, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसीचा समावेश आहे.
रिटेल ट्रान्जॅक्शनसाठी डिजिटल चलनाचे प्रायोगिक परीक्षण एक महिन्यात सुरू करण्याची योजना आहे. हे परीक्षण विशेष वापरकर्त्या समुहांदरम्यान निवडक स्थानी केले जाणार असून यात ग्राहक तसेच व्यावसायिक सामील असतील असे आरबीआयने म्हटले आहे. भविष्यातील प्रायोगिक परीक्षणांमध्ये घाऊक स्तरावर होणारे अन्य व्यवहार तसेच सीमेपलिकडून होणाऱया पेमेंटवरही लक्ष दिले जाणार असल्याचे आरबीआयकडून नमूद करण्यात आले.