दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने मार्कंडेय नदी प्रवाहित
प्रतिनिधी /बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयातील पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे डेडस्टोअरेजमधील पाणी उपसा करण्याची वेळ आली होती. मात्र याच दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने मार्कंडेय नदीचा प्रवाह सुरू झाला आहे. सोमवारी राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 6 इंचाने वाढली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी समस्येची चिंता मिटण्याची शक्मयता आहे.
एरव्ही जूनच्या पहिल्या आठवडय़ात सुरुवात होणाऱया पावसाने दडी मारली होती. त्यामुळे राकसकोप जलाशयातील पाणीसाठा संपत आला होता. केवळ 10 दिवस पुरेल इतका पाणीसाठा असल्याने पाणीपुरवठय़ात कपात केली आहे. तसेच डेडस्टोअरेजमधील पाणी उपसा करण्याची परिस्थिती येऊन ठेपली. मात्र दोन दिवसांपासून जलाशयपात्राच्या परिसरात पाऊस सुरू असल्याने मार्कंडेय नदीचे पात्र प्रवाहित झाले आहे.
सोमवारी सकाळी 8 वा. राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 2451.8 फूट इतकी होती. दिवसभर पाऊस सुरू असल्याने सायंकाळपर्यंत 6 इंचाने पाणीपातळीत वाढ झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 2452.4 फूट इतकी पाणीपातळी होती.